प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाची सुरुवात पराभवाने केल्यानंतर यू मुम्बाने आपल्या दुसऱ्या सामन्यात अखेर विजय संपादीत केला आहे. मात्र हा विजय मिळवण्यासाठी यू मुम्बाला प्रयत्नांची चांगलीच पराकाष्टा करावी लागली. नवोदीत हरियाणा स्टिलर्सच्या संघाने यू मुम्बाला चांगलीच टक्कर दिली. मात्र वेळेत स्वतःला सावरत अनुप कुमार आणि यू मुम्बाच्या संघाने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना २९-२८ अशा एका गुणाच्या फरकाने आपल्या खिशात घातला.

हरियाणा स्टिलर्सचा संघ या पर्वात नव्याने दाखल झालेला आहे. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासून हरियाणाच्या खेळाडूंनी मुम्बाच्या खेळाडूंना चांगलीच टक्कर दिली. दोन्ही कोपरारक्षक सुरिंदर नाडा आणि मोहीत छिल्लर, रेडींग डिपार्टमेंटमध्ये वझीर सिंह आणि विकास कंडोला यांनी हरियाणाकडून उत्कृष्ठ कामगिरी केली. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये कॅप्टन कूल अनुप कुमारच्या डावपेचांना मात द्यायला त्यांना जमलं नाही, आणि त्यांना सामना गमावला.

यू मुम्बाची निराशाजनक सुरुवात –

आपल्या पहिल्या सामन्याप्रमाणे यू मुम्बाची या सामन्यात फारशी चांगली सुरुवात झाली नाही. सुरुवातीची काही मिनीटं तर सामना बरोबरीत सुरु होता. मात्र त्यानंतर हरियाणाच्या वझीर सिंह, विकास कंडोलाने मॅरेथॉन रेड करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. या सर्वात विकास कंडोलाने दखलपात्र खेळ केला. आपला पहिला सामना खेळत असलेल्या विकासने मुम्बाच्या अनेक खेळाडूंना बाद केलं.

पहिल्या सत्रात हरियाणाच्या खेळाडूंनी केलेल्या झंजावाती खेळापुढे यू मुम्बाचा संघ ऑलआऊट केला. यामुळे मुम्बाचे खेळाडू काहीसे दबावाखाली खेळताना दिसले.

स्टार बचावपटूंची निराशा, सुरिंदर सिंह मात्र चमकला –

डी. सुरेश कुमार आणि जोगिंदर नरवाल या स्टार बचावपटूंना या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सत्रात डी. सुरेश कुमार तरर सतत अपयशी ठरत होता. या अपयशाचं सत्र इतक सतत सुरु राहिलं की, प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार सुरींदर नाडा आपल्या खेळाडूंना सतत डी. सुरेशवर आक्रमण करायला सांगत होता.

मात्र नवोदीत सुरिंदर सिंहने मात्र आपल्या पहिल्या सामन्यात प्रत्येकाची शाबासकी मिळवली. सुरिंदरने पहिल्या सत्रापासून हरियाणाच्या रेडर्सना चांगलं टॅकल केलं. अँकल होल्ड, डॅश यासारखे काही पॉईंट सुरिंदर सिंहने अतिशय सुंदर घेतले. यामध्ये वझीर सिंहचा सुरिंदरने केलेला बॅकहोल्ड केवळ पाहण्यासारखा होता. या पॉईंटनंतर कर्णधार अनुप कुमारनेही सुरिंदरचं मैदानात कौतुक केलं.

दुसऱ्या सत्रात मात्र सुरेश कुमार आणि जोगिंदर नरवाल यांनी काही चांगले पॉईंट घेतले. विशेषकरुन सुरेश कुमारने केलेला सुपर टॅकल, जोगिंरदर सिंहने मिळवलेले महत्वाचे पॉईंट यामुळे मुम्बा काही क्षणासाठी आघाडी घेतली होती.

मुंबईकडून काशिलींग, तर हरियाणाकडून विकास कंडोला चमकले –

सांगलीच्या काशिलींग अडकेला आजच्या सामन्यात सूर सापडला. अनुपच्या सोबतीने त्याने आजच्या सामन्यात ७ पॉईंट मिळवले. यात एका सुपर रेडचाही समावेश होता. अनुपच्या अनुपस्थित काशिलींगने हरियाणाच्या बचावपटूंना चांगलच झुंजवलं. यात मधल्या बचावपटूला दिलेली फ्लाईंग किक ही वाखण्याजोगी होती. त्यामुळे आजच्या सामन्यात अनुपवर फारसा दबाव आलेला दिसला नाही.

तर हरियाणाकडून विकास कंडोलाने सगळ्यांची मन जिंकून घेतली. आजच्या खेळीदरम्यान विकासने मॅरेथॉन रेड करत मुम्बाच्या बचावफळीत खिंडार पाडलं. सुरेश कुमार आणि जोगिंदर नरवालला आपलं लक्ष्य बनवत विकास कंडोलाने काही चांगले पॉईंट घेतले. यामध्ये उजव्या कोपऱ्यावर खेळणाऱ्या अनुप कुमारलाही विकासने आपल्या रेडमध्ये लक्ष्य केलं.

याव्यतिरीक्त हरियाणाकडून कर्णधार सुरिंदर नाडा आणि मोहीत छिल्लर यांच्या जोडगोळीने आपल्यात सुरेख ताळमेळ साधत नितीन मदने, शब्बीर बापूला आऊट केलं. कर्णधार सुरिंदर नाडाने या सामन्यात बचावात ५ पॉईंट मिळवले. अखेरच्या सेकंदापर्यंत या सामन्यात हरियाणाने आपली हार मानली नव्हती. मात्र शेवटची ३० सेकंद शिल्लक असताना कर्णधार अनुप कुमारने रिकामी रेड ( एम्टी रेड ) करत यू मुम्बाचा विजय एका गुणाने निश्चीत केला.