कर्णधार नितीन तोमर आणि मुंबईकर रिशांक देवाडीगा यांनी केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर यूपी योद्धाजने पाटणा पायरेट्सचा घरच्या मैदानावर पराभव केला. ४६-४१ अशा फरकाने सामना जिंकत उत्तर प्रदेशने गतविजेत्या संघाला पराभवाचा धक्का दिला.

उत्तर प्रदेशकडून सामन्याचा हिरो ठरला तो कर्णधार नितीन तोमर. नितीनने सामन्यात १८ गुणांची कमाई करत पाटण्याच्या बचावफळीला खिंडार पाडलं. यात अनेक सुपर रेडचाही समावेश होता. त्याला मुंबईकर रिशांक देवाडीगानेही ११ गुण मिळवत चांगली साथ दिली. सुरिंदर सिंहनेही या दोन खेळाडूंना ५ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उत्तर प्रदेशच्या बचावफळीनेही आज आपली चमक दाखवली. अनुभवी जीवा कुमारने बचावात सर्वाधीक ३ गुणांची कमाई केली. त्याला नितीश कुमार आणि सागर कृष्णाने चांगली साथ दिली.

सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा अवलंबलेल्या उत्तर प्रदेशच्या खेळाने पाटण्याचा संघ बॅकफूटला ढकलला गेला. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच उत्तर प्रदेशने भक्कम आघाडी घेतली. अखेरच्या सत्रात पाटण्याचा कर्णधार प्रदीप नरवालने मॅरेथॉन चढाई करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. प्रदीपने सामन्यात १३ गुणांची कमाई केली. मात्र मोनू गोयत आणि इतर खेळाडूंकडून त्याला हवीतशी मदत मिळाली नाही.

बचावफळीत विशाल माने आणि सचिन शिंगाडे या जोडीने ३ गुणांची कमाई केली. मात्र उत्तर प्रदेशच्या चढाईपटूंवर अंकुश लावणं त्यांनाही शक्य झालं नाही. अखेरच्या सत्रात पाटण्याने बदली खेळाडूंच्या जोरावर सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, मात्र उत्तर प्रदेशच्या खेळापुढे त्यांची डाळ शिजू शकली नाही. या सामन्यात पराभव पदरी पडला असला तरीही ब गटात पाटणा गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. उत्तर प्रदेशच्या खात्यात ४३ गुण असून, सध्या हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.