गतविजेच्या पाटणा पायरेट्सने प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामात बाद फेरीत हरियाणा स्टिलर्सचा धुव्वा उडवला. ६९-३० अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत पाटणा पायरेट्सने पुढच्या फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी पाटणा पायरेट्सला पुणेरी पलटणविरुद्ध दोन हात करायचे आहेत. हरियाणाविरुद्धच्या सामन्यात पाटण्याचा कर्णधार प्रदीप नरवालने चढाईत तब्बल ३४ गुणांची कमाई केली. याचसोबत पाचव्या हंगामात प्रदीपने चढाईत ३०० गुणांचा टप्पाही ओलांडला. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदीपच्या खेळीचं पाटण्याच्या प्रशिक्षकांनी तोंडभरुन कौतुक केलं.

मात्र सामन्यात आपला संघ निर्विवाद वर्चस्व गाजवत असतानाही राममेहर सिंह आपल्या बचावपटूंवर काहीसे नाराज दिसत होते. सामना सुरु असताना राममेहर सिंह यांनी वेळोवेळी आपल्या खेळाडूंची कानउघडणीही केली. पाटण्याच्या चढाईपटूंनी कालच्या सामन्यात आपली कामगिरी चोख बजावली असली तरीही संघाचे दोन महत्वाचे बचावपटू म्हणून ओळखले जाणारे विशाल माने आणि सचिन शिंगाडे यांना सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. विशालची सामन्यात गुणांची पाटी कोरीच राहिली तर सचिन शिंगाडेला अवघ्या एका गुणावर समाधान मानावं लागलं. विशाल आणि सचिनच्या कामगिरीवर तुम्ही नाराज आहात का, असं लोकसत्ता ऑनलाईनने विचारलं असताना राममेहर सिंह यांनी अतिशय सावधपणे याचं उत्तर दिलं.

“विशाल माने आणि सचिन शिंगाडे हे दोन्ही खेळाडू माझ्या संघातले अनुभवी खेळाडू आहेत. दोघांकडे पाच हंगाम प्रो-कबड्डी खेळण्याचा अनुभव आहे. इतका अनुभव तर प्रदीप नरवालकडेही नाही. त्यामुळे साहजिकच माझ्या या दोन्ही खेळाडूंकडून जास्त अपेक्षा आहेत. कठीण काळात त्यांनी संघाची बाजू सांभाळावी अशी माझी अपेक्षा असते.” मात्र आपण विशाल आणि सचिनवर नाराज असल्याच्या वृत्ताला त्यांनी नकार दर्शवला. विशाल आणि सचिन या दोघांनीही कालच्या सामन्यात चांगला खेळ केला. या दोघांव्यतिरीक्त विजय आणि जयदीप हे आमचे दोन खेळाडू बचावफळीत चांगले चमकले. फक्त सामन्यात आमचे बचावपटू काही क्षुल्लक चुका करत होते, जे मला घडू द्यायचं नव्हतं. यासाठी मी वारंवार त्यांना सुचना देत असल्याचं राममेहर सिंह यांनी स्पष्ट केलं.

प्रदीप हा पाटण्याच्या संघाचा कणा आहे. जर सामन्याच्या सुरुवातीपासून प्रदीपने जोर पकडला तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. मात्र एखाद्या वेळी समोरचा संघ व्यूहरचना आखत प्रदीपला बाद करतो, अशावेळी प्रदीप हा एखाद्या हट्टी मुलासारखा त्याच त्याच जागी चढाई करतो. अशावेळी आपल्या खेळात थोडा बदल करावा हे त्याला समजतं नाही आणि त्याचा फटका संघाला बसतो. अशावेळी विशाल आणि सचिन हे माझ्यासाठी महत्वाचे खेळाडू आहेत. कोणत्या खेळाडूने चढाईला जावं, बचावाची रणनिती काय असेल हे सर्व निर्णय विशाल माने मैदानात घेतो. त्यामुळे विशाल आणि सचिन हे माझ्या संघातल्या बचावफळीचे महत्वाचे आधारस्तंभ असल्याचं राममेहर सिंह यांनी मान्य केलं.

अंतिम फेरी गाठण्यासाठी पाटणा पायरेट्सला पुणेरी पलटण संघाचा सामना करायचा आहे. या सामन्यातही प्रदीपला बाद करण्यासाठी समोरच्या संघाने आराखडे मांडले असतील यात काही शंका नाही. त्यामुळे या सामन्यासाठी मैदानात उतरताना आम्हीही काही खास गोष्टी डोळ्यासमोर ठेवत मैदानात उतरु असं म्हणतं राममेहर सिंह यांनी पुणेरी पलटण संघाला इशारा दिला आहे.

अवश्य वाचा – सुरिंदर, मोहीतवर अवलंबून राहिलो हेच चुकलं, हरियाणाच्या प्रशिक्षकांकडून पराभव मान्य