प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामात गतविजेत्या पाटणा पायरेट्सने अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. बादफेरीच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने हरियाणा स्टिलर्सचा धुव्वा उडवला. यानंतर कालच्या सामन्यात पुणेरी पलटणची झुंज मोडून काढत पाटणा पायरेट्सने बंगालविरुद्धच्या लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. याआधी गुजरात फॉर्च्युन जाएंट संघाने बंगाल वॉरियर्सवर एकतर्फी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र मैदानातील या विजयानंतर गुजरात आणि पाटणा या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगायला सुरुवात झाली आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – अखेरच्या मिनीटांत प्रदीपचं धक्कातंत्र, पाटण्याची पुणेरी पलटणवर मात

बंगालवर मात करुन अंतिम फेरी गाठल्यानंतर गुजरातचा संघ आणि प्रशिक्षक मनप्रीत सिंह चांगलाच आनंदात होता. पत्रकार परिषदेत ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने अंतिम सामन्यात पाटणा पायरेट्सशी लढत झाल्यास प्रदीप नरवालला कसं थांबवाल, असा प्रश्न विचारला असताना मनप्रित म्हणाला, प्रदीप हा देखील एक माणूसच आहे. सध्या तो चांगल्या फॉर्मात आहे. यात काही वाद नाही. मात्र गुजरातमध्ये आमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात प्रदीप एकदाही चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे आमच्यासाठी अंतिम फेरीत पाटणा पायरेट्सचं आव्हान हे नगण्य स्वरुपात असेल. किंबहुना पाटण्याचा संघ अंतिम फेरीत आमच्यासमोर यावा अशी आम्ही प्रार्थना करत असल्याचं सांगत मनप्रीतने पाटण्याच्या संघाला आव्हान दिलं.

यानंतर पुणेरी पलटण विरुद्ध पाटणा पायरेट्सच्या सामन्यात एका क्षणापर्यंत पाटण्याचा संघ सामन्यात ८ गुणांनी पिछाडीवर पडला होता. मात्र प्रदीप नरवालने आपल्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यातील चढाईची पुनरावृत्ती करत, एकाच चढाईत पुण्याच्या ५ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. प्रदीपच्या या चढाईने सामन्यात आघाडीवर असलेला पुण्याचा संघ बॅकफूटला ढकलला गेला. सामना संपल्यानंतर पाटणा पायरेट्सचे प्रशिक्षक राममेहर सिंह यांना मनप्रीतने दिलेल्या आव्हानाविषयी विचारलं असता, त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

“माझा संघ या स्पर्धेत दोन वेळा विजेता राहिलेला आहे. मात्र आम्ही आतापर्यंत आमच्या वागण्यात इतका अतिआत्मविश्वास दाखवला नव्हता. जर बंगालविरुद्धच्या सामन्यात आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तर अंतिम सामन्यात याच पत्रकार परिषदेत मनप्रितला सोबत बसवून मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देईन.” एखाद्या प्रशिक्षकाने अशी आव्हानात्मक भाषा करणं योग्य नसल्याचंही राममेहर सिंह म्हणाले. कित्येकांना सामन्यानंतर पत्रकार परिषदेत वक्तव्य करण्याची सवय असते. दोन वर्षांपूर्वी जयपूरच्या संघाने साखळी फेरीत आमचा पराभव केला होता. मात्र अंतिम सामन्यात आम्ही त्यांच्यावर मात केली. जर खेळाडूंनी आव्हानाची भाषा केली तर समजून घेता येतं, मात्र प्रशिक्षकांनी आव्हानाची भाषा करणं योग्य नसल्याचं सांगत राममेहर सिंह यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

या दोन प्रशिक्षकांमधल्या शाब्दिक चकमकीमुळे प्रो-कबड्डीच्या अंतिम सामन्याची रंगत वाढली आहे. अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी पाटण्याला उद्याच्या सामन्यात बंगालच्या संघावर मात करावी लागणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत गुजरात फॉर्च्युनजाएंट विरुद्ध पाटणा पायरेट्स संघाचा सामना झाल्यास नेमका कोणता संघ बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – गुजरातचे सिंह बंगालच्या वाघांवर वरचढ, गुजरात फॉर्च्युनजाएंट अंतिम फेरीत