प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पंचांकडून दिल्या जाणाऱ्या वादग्रस्त निर्णयाचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. मुंबईत बंगाल वॉरियर्स विरुद्ध बंगळुरु बुल्स सामन्यात, बंगळुरुच्या रविंदर पेहलला पंचांनी रेड कार्ड दाखवलं. प्रो-कबड्डीच्या नियमानूसार एखाद्या खेळाडूला रेड कार्ड दाखवलं, तर त्याला सामन्यातून बाहेर काढण्यात येतं. मात्र बंगळुरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने या निर्णयावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – प्रो-कबड्डीत रेफ्रींचे चुकीचे ‘पंच’, दिग्गज खेळाडू नाराज

कालच्या सामन्यादरम्यान रविंदर पेहलने बंगालचा चढाईपटू जँग कून लीची पकड केली. यावेळी बंगळुरुच्या कोर्टात ३ खेळाडू शिल्लक असल्यामुळे नियमानूसार पंचांनी रविंदरला २ पॉईंट देणं अपेक्षित होतं. मात्र रविंदरने पकड केल्यानंतर ५ सेकंदपेक्षा जास्त काळानंतर जँग कून लीने स्वतःची सुटका करुन घेत मध्यरेषा पार केली. आणि यावेळी पंचांनी रविंदर पेहलऐवजी जँग कून लीला ३ पॉईंट बहाल केले. पंचांच्या या निर्णयामुळे आश्चर्यचकीत झालेल्या रविंदरने सामना सुरु असताना पंचांजवळ आपली नाराजी व्यक्त केली, यादरम्यान पंचांमध्ये आणि रविंदर पेहलमध्ये काहीशी बाचाबाचीही झाली. या कारणामुळे पंचांनी रविंदर पेहलला रेड कार्ड दाखवत संघाच्या बाहेर काढलं.

सामना संपल्यानंतर बंगळुरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने पंचांच्या या निर्णयाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. “रविंदरने पंचांसोबत हुज्जत घालायला नको होती, मात्र त्याला रेड कार्ड दाखवणं चुकीचं होतं. त्याला पंचांनी समज देऊन अथवा दोन मिनीटांसाठी संघाबाहेर बसवलं असतं तर योग्य ठरलं असतं. मात्र रेड कार्ड दाखवून सामन्याबाहेर काढण्याचा निर्णय नक्कीच योग्य नव्हता. या एका निर्णयामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास पुरता खचला.”

अवश्य वाचा – मी तुमचं काय घोडं मारलंय? निलेश साळुंखेचा पंचांना सवाल

यावेळी रविंदरची बाजू मांडताना रोहित म्हणाला, “जँग कून लीची पकड केल्यानंतर साधारण ३ ते ४ सेकंदांमध्ये पंचांनी आपला निर्णय देणं अपेक्षित होतं. मात्र पंचांनी ६ ते ७ सेकंदापेक्षा जास्त काळ घेतला, ज्यामुळे जँग कून लीला मध्यरेषेकडे परतण्याचा पुरेसा वेळ मिळाला.” पंचांच्या या एका निर्णयामुळे सामना आमच्या हातातून निसटला, असं म्हणतं रोहितने पंचांच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – आम्हाला गुजरातने नाही, पंचांनी हरवलं ! जयपूरचे प्रशिक्षक पंचांवर नाराज

याआधीही निलेश साळुंखे, अनुप कुमार, मनजीत छिल्लर या खेळाडूंना आणि त्यांच्या संघांना पंचांच्या खराब कामगिरीचा फटका बसला होता. प्रो-कबड्डीतल्या पंचांच्या या कामगिरीवर क्रीडारसिकांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पंचांची खराब कामगिरी या स्पर्धेच्या खिलाडूवृत्तीला गालबोट तर लावणार नाही ना असा सूर आता कबड्डीप्रेमींमध्ये उमटताना दिसतोय.