News Flash

Pro Kabaddi Season 6 : दिल्ली विरुद्ध गुजरात सामना बरोबरीत

दोन्ही संघातले बचावपटू चमकले

दिल्लीकडून चढाईत गुणांची कमाई करणारा चंद्रन रणजीत

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात दुसरा सामना बरोबरीत सुटला आहे. पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला दबंग दिल्लीने शेवटच्या क्षणापर्यंत कडवी टक्कर देत बरोबरीत रोखलं. ३२-३२ च्या गुणांनी हा सामना बरोबरीत सुटला, याआधी पहिल्या दिवशी यू मुम्बा विरुद्ध पुणेरी पलटण हा सामना बरोबरीत सुटला होता.

दिल्लीच्या तुलनेत तरुण खेळाडूंचा संघ असलेल्या गुजरातच्या संघाने पहिल्या सत्रात आक्रमकपणे सुरुवात केली. सचिन तवंर, रोहित गुलिया या चढाईपटूंनी दिल्लीच्या बचावफळीला खिंडार पाडलं. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये दिल्लीच्या बचावफळीतल्या खेळाडूंनी अतिशय क्षुल्लक चुका केल्या. याचा फायदा घेत गुजरातने पहिल्या सत्रावर आपलं वर्चस्व कायम राखलं. दिल्लीकडून शब्बीर बापू, अष्टपैलू मिराज शेख हे खेळाडू फारशी चमक दाखवू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्या सत्रात सर्वबाद झाल्यानंतर दिल्लीने मिराज व शब्बीरऐवजी बदली खेळाडू संघात उतरवले. चंद्रन रणजीतने यानंतर दिल्लीकडून खेळताना सामन्याचं रुपडं पालटलं. चढाईत चंद्रनने काही चांगल्या गुणांची कमाई करत दिल्लीला सामन्यात पुन्हा आणलं, मात्र मध्यांतराला गुजरातने १७-१२ अशी ५ गुणांची आघाडी कायम केली.

यानंतर दुसऱ्या सत्रात दिल्लीच्या खेळाडूंनी आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. कर्णधार जोगिंदर नरवाल, उजवा कोपरारक्षक रविंदर पेहल यांनी गुजरातच्या चढाईपटूंच्या काही चांगल्या पकडी गेल्या. यामुळे मध्यांतरापर्यंत ५ गुणांनी आघाडीवर असलेला गुजरातचा संघ काहीसा कोलमडला. सोबतीला चंद्रन रणजित आणि पवन कुमारने चढाईत गुण घेण्याचा सपाटा कायम ठेवत गुजरातला मोठी आघाडी घेण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या सत्रात गुजरातकडून उजवा कोपरारक्षक ऋतुरात कोरावीनेही काही चांगल्या पकडी केल्या, मात्र मोक्याच्या क्षणी त्याच्या हातातूनही काही क्षुल्लक चुका झाल्या. सामना संपायला अवघी काही सेकंद शिल्लक असताना दिल्लीने गुजरातला सर्वबाद करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर शेवटच्या चढाईत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी फारसा धोका न पत्करता सामना बरोबरीत सोडवण्यामध्ये समाधान मानलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2018 9:29 pm

Web Title: pro kabaddi season 6 2018 gujrat fortunegiants settle for draw against dabang delhi
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या सामन्यात यूपी योद्धाची तामिळ थलायवाजवर मात
2 Pro Kabaddi Season 6 : एकतर्फी सामन्यात पुणेरी पलटणची हरयाणा स्टिलर्सवर मात
3 Pro Kabaddi, Season-6 : मुंबई पुण्यात कांटे की टक्कर, सामन्यात 32-32 अशी बरोबरी
Just Now!
X