प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईने सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा मान पटकावला. तेलगू टायटन्स संघाने सिद्धार्थ देसाईवर १ कोटी ४५ लाखांची बोली लावली. सहाव्या हंगामात यू मुम्बाकडून आक्रमक खेळी करणारा सिद्धार्थ यंदा तेलगू टायटन्सकडून मैदानात उतरेल. सिद्धार्थचा भाऊ सूरज देखील त्याच्यासोबत तेलगू टायटन्सच्या संघात असणार आहे.

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी नावाच्या छोट्या गावातून प्रो-कबड्डीसारख्या मोठ्या मंचावर सिद्धार्थने स्वतःला सिद्ध केलं आहे. फार कमी वेळात दिग्गज खेळाडूंना टक्कर देत सिद्धार्थने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. कोट्यवधी रुपयांची बोली, अपेक्षांचं ओझ आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी स्पर्धा या पार्श्वभूमीवर loksatta.com ने सिद्धार्थशी बातचीत केली. या मुलाखतीचा हा सारांश….

१) सिद्धार्थ तुला यंदा सर्वात जास्त बोली लागली आहे, मी जर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकलो नाही तर काय होईल अशी भीती नाही वाटत का??

नाही, अजिबात भीती नाही वाटत. मागच्या हंगामात यू मुम्बाकडून खेळतानाही मला चांगली बोली लागली होती. पहिल्याच हंगामात मला ३६ लाख मिळाले होते. त्यावेळीही मी चांगली कामगिरी केली होती. यंदा मी कोणताही दबाव स्वतःवर घ्यायचा नाही असं ठरवलं आहे. तेलगू टायटन्ससाठी १०० टक्के कामगिरी करणं इतकचं माझं ध्येय आहे.

२) तेलगू टायटन्स संघात तू आणि सूरजचा अपवाद वगळता, चढाईपटूंची कमतरता जाणवते, यावर तुझं मत काय आहे?

तेलगू टायटन्सने यंदा तरुण खेळाडूंना संधी देण्याचं ठरवलं आहे. मागच्या हंगामात यू मुम्बानेही अशाचप्रकारे तरुण खेळाडूंना संधी दिली होती. जेव्हा तरुण खेळाडूंना तुम्ही संधी देता, त्यावेळी तुमच्याकडे एक बाजू जमेची असते. हे खेळाडू नेमके कसे खेळतात, त्यांच्या खेळाची शैली ही प्रतिस्पर्धी संघाला माहिती नसते. त्यामुळे या खेळाडूंना तुम्ही एक चांगली रणनिती ठरवुन तयार करु शकता. यंदाही अशाच तरुण खेळाडूंसोबत तेलगू टायटन्स हा एक उत्तम संघ तयार झाला आहे.

तरुण खेळाडूंसोबत सरावादरम्यान आमचा संघ अजुन मजबूत होईल याची मला खात्री आहे. यंदा माझा भाऊ सूरज देखील माझ्यासोबत खेळणार आहे, त्यामुळे त्याची आणि माझी जोडी चांगली तयार झाली आहे. त्यामुळे यंदा तेलगू टायटन्स या नवीन खेळाडूंच्या सोबतीने चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे.

३) तुझा भाऊ सूरजचा तुझी कारकिर्द घडवण्यात मोठा वाटा आहे, त्याच्याकडून कायकाय शिकायला मिळतं तुला??

मी लहानपणापासून सुरजला खेळताना पाहत आलोय. त्याच्या खेळाची प्रत्येक शैली मी आत्मसात करत आलोय. पुण्यात एका क्लबकडून आम्ही खेळायचो तेव्हा त्याने मला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या. सातव्या हंगामात तो आणि मी जेव्हा मैदानावर उतरु, तेव्हा आमच्या खेळात तुम्हाला बरचं साम्य जाणवेल. माझा भाऊ माझा रोल मॉडेल आहे.

४) सातव्या हंगामात तेलगू टायटन्सचं भवितव्य कसं असेल?

आमची बचावफळी अतिशय तगडी आहे. सी. अरुण, विशाल भारद्वाज, अबुझार मेघानी यासारखे तरुण आणि अनुभवी बचावपटू संघात असल्यामुळे आमचा संघ चांगला तयार झालाय. चढाईपटूंमध्ये काही नवीन खेळाडू संघात आहेत, ज्याचा आम्हाला खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे यंदा विजेतेपद पटकावण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत.

५) लिलावादरम्यान तू तुझ्या गावातल्या कबड्डी खेळणाऱ्या मुलांच्या सोयी-सुविधांबद्दल बोलला होतास, त्याबद्दल काही सांगू शकशील?

मी कोल्हापूरमध्ये चंदगड तालुक्यात हुंदळेवाडी नावाच्या गावात राहतो. अंदाजे ३०० च्या घरात लोकसंख्या असलेलं माझं छोटसं गाव आहे. गावात खेळण्यासाठी एकही मैदान नाहीये. आम्ही सराव करताना कोणच्यातरी शेतात जाऊन, तात्पुरतं मैदान बनवून खेळायचो. पुढे जाऊन मला गावातल्या अन्य खेळाडूंसाठी एक हक्काची जागा शोधायची आहे, त्यांना सराव करायला हक्काची जागा नाहीये. त्यांना संधी मिळाली तर अजुन चांगले खेळाडू कबड्डीमध्ये तयार होतील.