कर्णधार मणिंदर सिंह, के. प्रपंजन यांच्या आक्रमक चढाया आणि बचावफळीत रिंकू नरवाल आणि इतर साथीदारांनी केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने पाटणा पायरेट्सवर मात केली आहे. ३५-२६ च्या फरकाने पाटण्याचा धुव्वा उडवत बंगालने गुणतालिकेत दुसरं स्थान कायम राखलं आहे.

बंगालच्या खेळाडूंनी आजच्या सामन्यात अष्टपैलू खेळ केला. मणिंदर सिंह आणि प्रपंजन यांनी पाटण्याच्या बचावफळीवर हल्ले चढवत झटपट गुण मिळवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या या हल्ल्यांमधून पाटण्याचा संघ सावरुच शकला नाही. महत्वाच्या बचावपटूंना लक्ष्य करत दोन्ही चढाईपटूंनी बंगालसाठी महत्वाच्या गुणांची कमाई केली. विकास जगलान-जयदीप हे पाटण्याचे खेळाडू बंगालच्या चढाईपटूंवर अंकुश ठेऊ शकले नाहीत. बंगालकडून बचावफळीत रिंकू नरवालने ५ गुणांची कमाई केली. त्याला इतर खेळाडूंनीही चांगली साथ दिली.

दुसरीकडे पाटणा पायरेट्सकडून पुन्हा एकदा प्रदीप नरवालने एकाकी लढत दिली. प्रदीपने चढाईत १२ गुण कमावले. मात्र त्याला इतर खेळाडूंनी हवीतशी साथ मिळू शकली नाही. मोहम्मद मग्शदुलू, विकास जगलान, जयदीप हे खेळाडू आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीत. इराणच्या हादी ओश्तनोकही आजच्या सामन्यात अपयशी ठरला. या पराभवामुळे पाटणा पायरेट्सचा संघ गुणतालिकेत अद्यापही तळातल्या स्थानावर आहे.