प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्स संघाच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. पाटण्याच्या पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्पेक्समध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरु बुल्सने पाटणा पायरेट्सचा ४७-२६ ने धुव्वा उडवला. तेलगू टायटन्सचा या स्पर्धेतला हा पाचवा पराभव ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये तेलगू टायटन्सने केवळ एक सामन्यात बरोबरी साधली आहे.

बंगळुरु बुल्सने आजच्या सामन्यात अष्टपैलू खेळ करुन दाखवला. पवन शेरावतने चढाई आणि पकडीत एकूण १७ गुणांची कमाई केली. त्याला चढाईमध्ये रोहित कुमार आणि बचावफळीत मेहंदर सिंहने ७ गुण मिळवत चांगली साथ दिली. तेलगू टायटन्सच्या बचावफळीला खिंडार पाडण्याचं काम पवन आणि रोहितने करुन दाखवलं.

तेलगू टायटन्सकडून आजच्या सामन्यातही सिद्धार्थ देसाईने एकाकी झुंज दिली. मात्र त्यालाही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सिद्धार्थने सामन्यात ११ गुण मिळवले. त्याला विशाल भारद्वाजने ६ गुण मिळवत चांगली साथ दिली. मात्र इतर खेळाडू मोक्याच्या क्षणी आपला खेळ सुधारु शकले नाही. ज्याचा फायदा घेत बंगळुरु बुल्सने सामन्यावर आपलं पूर्णपणे वर्चस्व मिळवलं. बंगळुरु बुल्सचा प्रो-कबड्डीच्या इतिहासातला हा दुसरा मोठा विजय ठरला आहे.