प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पुणेरी पलटण संघाची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. सोमवारी मुंबईच्या मैदानात झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने पुणेरी पलटणवर मात केली. प्रो-कबड्डीतला सातव्या पर्वातला पुणेरी पलटणचा हा तिसरा पराभव ठरला. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, प्रशिक्षक अनुप कुमारने पुणेरी पलटण संघाचं सगळच बिनसलय अशी हताश प्रतिक्रीया दिली.

बंगालविरुद्धच्या सामन्यात पुण्याचे नावाजलेले खेळाडू पुन्हा एकदा अपयशी ठरले. अनुभवी नितीन तोमर संघात नसल्याचा पुणेरी पलटण संघाला चांगलाच फटका बसला. मागच्या हंगामात दिल्लीकडून खेळणारा पवन कादियानही या सामन्यात आपली छाप पाडू शकला नाही. अखेरीस बदली खेळाडू पंकज मोहीतेने चढाईमध्ये सहा गुणांची कमाई केली. बचावफळीतही कर्णधार सुरजित सिंहला एकही गुण कमावता आला नाही, डावा कोपरा गिरीश एर्नाकने एकाकी झुंज दिली. संघाच्या या विस्कटलेल्या घडीबद्दल विचारलं असता अनुप म्हणाला, “होय, ही गोष्ट खरी आहे यंदा आमचं सगळचं बिनसलंय. दोन्ही कोपऱ्यातल्या खेळाडूंचा समन्वय निट होत नाहीये. राईट कव्हरचा खेळाडू अजुन लयीत आलेला नाहीये. सराव सामन्यात ही मुलं चांगला खेळ करतात, मात्र मैदानात उतरल्यावर त्यांना काय होतं हे कळत नाहीये. पण या परिस्थितीमधूनही आम्ही लवकरच बाहेर येऊ.”

सलग ३ पराभवांनंतर संघाचा आत्मविश्वास कमी होणं स्वाभाविक आहे, तो आत्मविश्वास कायम रहावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जर नावाजलेले खेळाडू चांगली कामगिरी करत नसतील, तर मला त्यांना बाहेर बसवून नवोदीतांना संधी द्यावीच लागेल असा इशाराही अनुपने यावेळी बोलताना दिला. पुण्याकडून सोमवारी झालेल्या सामन्यात पंकज मोहीते, शहाजी जाधव, गिरीश एर्नाक, सुशांत सैल, अमित कुमार यांनी आश्वासक खेळ केला. त्यामुळे आगामी सामन्यात पुणेरी पलटणचा संघ कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.