प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने दबंग दिल्लीचा विजयरथ अखेरीस रोखला. मुंबईत झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर ३१-२६ अशी मात करत, गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. मराठमोळ्या गुरुनाथ मोरेने गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चढाई आणि बचावफळीत अष्टपैलू कामगिरी करत गुरुनाथ मोरेने ९ गुणांची कमाई केली. गुजरात फॉर्च्युनजाएंटचे प्रशिक्षक मनप्रीत सिंह त्यांच्या कामगिरीवर खुश आहेत.

“गुरुनाथ मोरे आमच्या संघाचं सरप्राईज पॅकेज आहे. दिल्लीसारख्या समतोल संघाविरुद्ध त्याने चढाई आणि बचावात आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. मी त्याच्यावर जो विश्वास ठेवला तो त्याने सार्थ ठरवून दाखवला.” मनप्रीत सिंहने गुरुनाथच्या खेळीचं कौतुक केलं. दरम्यान दिल्लीविरुद्धच्या सामन्यात गुरुनाथने प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये १०० गुणांचा टप्पा पार केला.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात गुजरातला गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावण्याची संधी होती. मात्र दिल्लीने आपल्या पराभवाचं अंतर ७ पेक्षा कमी गुणांचं ठेवत एका गुणाची कमाई केली. या एका गुणाच्या जोरावर दिल्ली १६ गुणांनिशी आपलं पहिलं स्थान टिकवून आहे.