चढाईपटूंनी मोक्याच्या क्षणी केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने बंगळुरु बुल्सला पराभवाचा धक्का दिला आहे. ३२-२३ च्या फरकाने सामन्यात बाजी मारत गुजरातने या स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे.

गुजरातने पहिल्या सत्रापासून सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. बंगळुरु बुल्सनेही गुजरातला चांगली झुंज दिली. सचिन तवंर, जी.बी. मोरे या खेळाडूंनी चढाईत बंगळुरु बुल्सच्या बचावफळीला खिंडार पाडलं. बंगळुरु बुल्सकडून सौरभ नंदाल आणि महेंदर सिंहने गुजरातला चांगली झुंज दिली, मात्र सचिन आणि जी.बी. मोरे यांनी अखेरपर्यंत सामन्याची सुत्र गुजरातकडे कायम राखली. पहिल्या सत्राच्या अखेरीस गुजरातचा संघ १८-१२ ने आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी एकमेकांना चांगली झुंज दिली. मात्र गुजरातच्या चढाईपटूंनी सामन्याची सुत्र अखेरपर्यंत आपल्या हाती कायम ठेवत सामन्यात बाजी मारली. गुजरातचा संघ गुणतालिकेत सध्या आठव्या तर बंगळुरु बुल्सचा संघ पाचव्या स्थानावर आहे.