अनुप विरुद्ध राकेश कुमार, असं चित्र निर्माण झालेल्या सामन्यात राकेश कुमारने बाजी मारली आहे. प्रो-कबड्डीच्या पहिल्या ६ हंगामापर्यंत खेळाडू म्हणून मैदानात उतरणारे अनुप आणि राकेश कुमार यंदा प्रशिक्षकांच्या भूमिकेत आहेत. अनुप पुणेरी पलटणला तर राकेश हरियाणा स्टिलर्सला प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे आजच्या सामन्याला प्रशिक्षकांमधलं द्वंद्व असं स्वरुप आलं होतं. अखेरीस राकेश कुमारच्या हरियाणा स्टिलर्सने अनुप कुमारच्या पुणेरी पलटणला पराभवाचं पाणी पाजलं आहे. ३४-२४ च्या फरकाने हरियाणाने सामन्यात बाजी मारली.

सामन्याच्या पहिल्या सत्रातापसून हरियाणाच्या संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात केली. नवीन आणि सेल्वामणी यांच्या झंजावाती चढायांनी पुण्याच्या बचावफळीत खळबळ माजवली. पुण्याचा कर्णधार सुरजित सिंह आणि डाव्या कोपऱ्यातला अनुभवी खेळाडू गिरीश एर्नाक यांच्यातल्या समन्वयाच्या अभावी पुण्याचा संघ सुरुवातीच्या क्षणांमध्ये बॅकफूटवर ढकलला गेला. हरियाणाच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्यात पुण्याचे बचावपटू अपयशी ठरले. शुभम शिंदेने ३ उत्कृष्ट पकडी करत थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही फारशी चमक दाखवू शकला नाही. पहिल्या सत्राच्या अखेरीस हरियाणाकडे २२-१० अशी १२ गुणांची मोठी आघाडी होती.

दुसऱ्या सत्रात पुण्याच्या चढाईपटूंनी हरियाणाला चांगली झुंज दिली. पवन कादीयानने चढाईमध्ये १० गुणांची कमाई करत हरियाणाच्या बचावफळीला खिंडार पाडलं. त्याला मनजीत आणि शहाजी जाधवने चांगली साथ दिली. मात्र बचावफळीतल्या समन्वयाचा अभाव पुण्याच्या संघाला चांगलाच महागात पडला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 – दिपक हुडाच्या झंजावातासमोर यू मुम्बाची शरणागती