तेलगू टायटन्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात विजयाची चव चाखलेल्या यू मुम्बा संघाला आपल्या दुसऱ्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासातील पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सने यू मुम्बावर ४२-२३ च्या फरकाने मात केली. जयपूरकडून कर्णधार दिपक निवास हुडाने चढाईत आक्रमक कामगिरी करत ११ गुणांची कमाई केली. बचावफळीतल्या खेळाडूंमधला समन्वयाचा अभाव आणि अनुभवी चढाईपटूंची कमतरता यामुळे यू मुम्बाचा संघ सामन्यात प्रतिकार करुच शकला नाही.

पहिल्या सत्रात जयपूर पिंक पँथर्सने धडाकेबाज सुरुवात केली. कर्णधार दिपक निवास हुडाने पहिल्याच चढाईमध्ये यू मुम्बाच्या दोन बचावपटूंची शिकार केली. यानंतर जयपूरने पहिल्या सत्रात मागे वळून पाहिलंच नाही. दिपक नरवाल, दिपक हुडा, नितीन रावल यांनी आक्रमक चढाया रचत यू मुम्बाच्या बचावफळीला खिंडार पाडलं. पहिल्या सत्राच्या अवघ्या काही मिनीटांमध्ये जयपूरने यू मुम्बाला ऑलआऊट करत १०-२ अशी आघाडी घेतली. बचावफळीमधल्या खेळाडूंमधला समन्वयाचा अभाव यू मुम्बाला पहिल्या सत्रात चांगलाच भोवला. चढाईत डाँग जिऑन लीने चढाईत काही गुण मिळवले. मात्र जयपूर पिंक पँथर्सने पहिल्या सत्राच्या अखेरीस २२-९ अशी १३ गुणांची भक्कम आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात यू मुम्बाच्या खेळाडूंनी चांगलं पुनरागमन केलं. अभिषेक सिंह आणि डाँग जिऑन ली यांनी चढाईत काही महत्वपूर्ण गुणांची कमाई करत यू मुम्बाची पिछाडी कमी केली. यादरम्यान यू मुम्बाच्या बचावफळीनेही आपल्या चढाईपटूंना चांगली साथ दिली. दुसऱ्या सत्रात यू मुम्बाकडे जयपूरला ऑलआऊट करण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. मात्र बचावफळीत कर्णधार फजलच्या उतावळेपणामुळे जयपूरने सामन्यात पुन्हा एकदा पुनरागमन केलं. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत जयपूरने यू मुम्बाला पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकलत सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. अखेरीस ४२-२३ च्या फरकाने जयपूरने सामन्यात बाजी मारली.