प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात आपल्या धडाकेबाज खेळीने सर्वांनी मनं जिंकणाऱ्या सिद्धार्थ देसाईने, सातव्या हंगामात पहिली कोट्यवधी रुपयांची बोली मिळवण्याच मान पटकावला आहे. तेलगू टायटन्स संघाने सिद्धार्थसाठी तब्बल १ कोटी ४५ लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. सहाव्या हंगामात यू मुम्बाकडून खेळताना सिद्धार्थने सर्वोत्कृष्ट उदयोनमुख खेळाडूचा मान पटकावला होता. मात्र सातव्या हंगामासाठी मुम्बाने त्याला आपल्या संघात कायम न राखल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

पहिल्या दिवसाच्या लिलावादरम्यान सिद्धार्थची किंमत ३० लाख ठरवण्यात आली होती. मात्र तेलगू टायटन्सने सर्वांना मागे टाकत सिद्धार्थसाठी थेट १ कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर तामिळ थलायवाज आणि तेलगू टायटन्स संघात संघर्ष पहायला मिळाला. मात्र तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाखांच्या बोलीवर सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात यश मिळवलं. यू मुम्बाकडे ‘फायनल बिड टू मॅच’ कार्डाद्वारे सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्याची संधी होती. मात्र इथेही यू मुम्बाने सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात स्वारस्य न दाखवल्यामुळे सिद्धार्थ देसाईचं तेलगू टायटन्सकडून खेळणं निश्चीत झालं आहे.

सिद्धार्थला आपल्या संघात घेणं हे ठरलेलं नव्हतं, मात्र बचावाची बाजू भक्कम झाल्यानंतर आम्ही सिद्धार्थला घेण्याचा प्लान केला आणि आम्ही त्यात यशस्वी झालो. तेलगू टायटन्सच्या संघमालकांनी लिलावानंतर याबाबतचं स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे आगामी काळात सिद्धार्थ तेलगू टायटन्स संघाकडून कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.