27 February 2021

News Flash

Pro Kabaddi 7 : बंगालच्या वाघांकडून पुणेरी सिंहाची शिकार

पुणेरी पलटणच्या पराभवाची हॅटट्रीक

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पुणेरी पलटण संघाला अजुनही आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईतल्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सच्या संघाने पुणेरी पलटणवर मात केली. पुणेरी पलटणचे खेळाडू आजच्या सामन्यात बंगालच्या झंजावाता सामनाच करु शकले नाहीत. दुसरीकडे बंगालने मात्र अष्टपैलू खेळ करत सामन्यात बाजी मारली.

पहिल्या सत्रातापासून बंगाल वॉरियर्सने आक्रमक खेळ करत सामन्यात आघाडी घेतली होती. चढाईपटू आणि बचावपटूंमधला उत्तम समन्वय बंगालला चांगलाच फायदेशीर ठरला. मणिंदर सिंहने पहिल्या सत्रात चढाईमध्ये ७ गुणांची कमाई केली. पुण्याच्या बचावफळीला खिंडार पाडण्यात मणिंदरने मोलाचा वाटा उचलला. त्याला इराणच्या मोहम्मद नबीबक्षने चांगली साथ दिली. बंगालच्या चढाईपटूंना थांबवणं पुण्याच्या खेळाडूंना जमलच नाही. दुसरीकडे बंगालच्या बचावपटूंनीही काही सुरेख पकडी करत आपल्या संघाची आघाडी कायम राखण्यात मोलाची भूमिका बजावली. या खेळाच्या जोरावर बंगालने मध्यांतराला १८-९ अशी मोठी आघाडी घेतली.

पुणेरी पलटणकडून गिरीश एर्नाक, शहाजी जाधव या खेळाडूंनी काही गुणांची कमाई करत बंगालला झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर खेळाडूंकडून त्यांना योग्य साथ मिळाली नाही, ज्यामुळे पुण्याचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. दुसऱ्या सत्रात पुणेरी पलटणला सर्वबाद करत बंगालने सामन्यात २४-११ अशी मोठी आघाडी घेतली. आपला संघ पिछाडीवर पडलेला पाहून प्रशिक्षक अनुप कुमारने बदली खेळाडूंना संघात जागा दिली. मात्र तरीही पुणेरी पलटणची परिस्थिती कायम राहिली. काही क्षणांमध्येच पुण्याचा संघ दुसऱ्यांदा सर्वबाद झाला.

अखेरच्या सत्रात पुण्याकडून पंकज मोहीते, सुशांत साहील यांनी चढाईत काही गुणांची कमाई केली. मात्र तोपर्यंत बंगालने सामन्यात भक्कम आघाडी घेतली होती. अखेरीस ४३-२३  च्या फरकाने पुणेरी पलटणवर मात करत बंगालने सातव्या हंगामातल्या आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 9:38 pm

Web Title: pro kabaddi season 7 puneri paltan dismal show continue as bengal warriors beat them by huge margin psd 91
Next Stories
1 Pro Kabaddi 7 : अटीतटीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सची बाजी, तामिळ थलायवाजचा पराभव
2 माझे रोहित शर्मा बरोबर मतभेद नाहीत – विराट कोहली
3 भल्याभल्या खेळाडूंना जमलं नाही ते एलिस पेरीने करुन दाखवलं !
Just Now!
X