प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तामिळ थलायवाज संघाची कामगिरी फारशी चांगली होताना दिसत नाहीये. अनेक दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असूनही तामिळ थलायवाजचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. सोमवारी तेलगू टायटन्स संघाविरोधात झालेल्या सामन्यातही तामिळ थलायवाजला पराभवचा धक्का सहन करावा लागला. तेलगू टायटन्सने तामिळ थलायवाजवर ३५-३० अशी मात केली. मात्र तामिळ थलायवाजच्या राहुल चौधरीने या सामन्यात एका अनोख्या कामगिरीला गवसणी घातली आहे.

तेलगू टायटन्सविरुद्ध सामन्यात चढाईत ४ गुणांची कमाई करत राहुलने प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये ९०० गुणांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा राहुल चौधरी दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालने ही कामगिरी करुन दाखवली होती. तेलगूविरुद्धच्या सामन्यात हा टप्पा ओलांडण्यासाठी राहुलला ३ गुणांची आवश्यकता होती, राहुलने ४ गुण मिळवत ही कामगिरी करुन दाखवली.

प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईत सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू –

प्रदीप नरवाल – ९६२ गुण
राहुल चौधरी – ९०१ गुण
अजय ठाकूर – ७९० गुण

दरम्यान आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दबंग दिल्ली संघाने आपलं वर्चस्व कायम राखलं असून ते गुणतालिकेत सध्या पहिल्या स्थानावर आहेत.