प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बाचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारपासून घरच्या मैदानासमोर यू मुम्बासमोर पुणेरी पलटण संघाचं आव्हान असणार आहे. सहाव्या हंगामाप्रमाणे यंदाच्या हंगामातही इराणचा अनुभवी बचावपटू फजल अत्राचली यू मुम्बाचं नेतृत्व करतोय. गेल्या सहा हंगामांच्या कालावधीमध्ये भारत हे आपल्यासाठी एकाप्रकारे दुसरं घर झाल्याचं फजलने म्हटलं आहे. तो मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होता.

सातव्या हंगामात यू मुम्बाच्या संघामध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. सहाव्या हंगामाचा हिरो ठरलेल्या सिद्धार्थ देसाईला यंदा मुंबईने संघात कायम राखलेलं नाहीये. नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यू मुम्बा यंदा मैदानात उतरला आहे. संघात होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणं कर्णधार म्हणून कितपत कठीण जातं असा प्रश्न विचारला असता फजल म्हणाला, “मी आतापर्यंत ६ हंगाम प्रो-कबड्डीत खेळलो आहे. त्यापैकी केवळ एक हंगाम मी इराणच्या प्रशिक्षकांसोबत खेळलो आहे, बाकीचे सर्व हंगाम आमचे प्रशिक्षक भारतीयच होते. भारत आता माझ्यासाठी एकाप्रकारे दुसरं घर झालंय. भारतीय प्रशिक्षकांसोबत माझा ताळमेळ चांगला जमलाय, सामन्यादरम्यान कधीही आम्हाला भाषेची अडचण येत नाही. तोडक्या-मोडक्या हिंदीमध्ये का होईना पण आम्ही संवाद साधतो.”

सहाव्या हंगामात साखळी सामन्यांमध्ये यू मुम्बाच्या संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र बाद फेरीत पहिल्याच सामन्यात त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. सातव्या हंगामात एक विजय आणि एक पराभव अशी यू मुम्बाची संमिश्र सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळत असताना प्रेक्षकांच्या पाठींब्याचा आम्हाला चांगला फायदा मिळेल असं यू मुम्बाच्या प्रशिक्षकांनी सांगितलं. संघात सुधारणेला अजुन वाव आहे, काही खेळाडू नवीन आहेत आणि त्यांच्या शैलीवर काम सुरु आहे. त्यामुळे या हंगामात यू मुम्बाचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.