प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बाने घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळत असताना, बलाढ्य गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर यू मुम्बाने सामन्यात ३२-२० च्या फरकाने बाजी मारली. गुजरातचा या हंगामातला हा पहिला पराभव ठरला आहे. यू मुम्बाने या विजयासह १७ गुणांनिशी गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे.

आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या यू मुम्बाने पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात केली. अभिषेक सिंह आणि रोहित बलियान या खेळाडूंनी यू मुम्बाला चढाईमध्ये गुण मिळवून देत आघाडी मिळवून दिली. यानंतर संपूर्ण सामन्यात दोन्ही संघाकडून बचावपटूंनी आपलं वर्चस्व राखलं. यू मुम्बाकडून फजल अत्राचली, सुरिंदर सिंह यांनी गुजरातच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात अडकवत मुम्बाचं पारडं नेहमी वर ठेवलं. गुजरातकडून गुरुनाथ मोरे व अन्य खेळाडूंनी गुण मिळवण्याचे प्रयत्न केले, मात्र यामध्ये त्यांना यश लाभलं नाही. गुजरातचा महत्वाचा खेळाडू सचिनला मुम्बाच्या बचावपटूंनी एकही गुण कमावू दिला नाही. बचावपटूंनी केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर यू मुम्बाने मध्यांतराला ९-७ अशी आघाडी घेतली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 : विजयाचा आनंदोत्सव पडला तेलगू टायटन्सला महागात, टेक्निकल पॉईंटच्या जोरावर उत्तर प्रदेशची बरोबरी

दुसऱ्या सत्रात यू मुम्बाच्या खेळाडूंनी आपला खेळ अधिक आक्रमक केला. चढाई आणि बचावपळीत यू मुम्बाने अष्टपैलू खेळ करत गुजरातला सर्वबाद करत मोठी आघाडी घेतली. यू मुम्बाच्या या झंजावातापुढे गुजरातचा संघ पुनरागमन करुच शकला नाही. त्यातचं यू मुम्बाचा बचावपटू सुरिंदर सिंहने केलेल्या चढाईत गुजरातच्या ४ बचावपटूंनी आपली विकेट बहाल केली, यामुळे गुजरात सामन्यात दुसऱ्यांदा सर्वबाद झालं. दुसऱ्या सत्रात यू मुम्बाकडून कोरियन खेळाडू यूंग चँग को यानेही काही महत्वाची गुण मिळवले. अखेरीस आपल्याजवळची मोठी आघाडी कायम राखत यू मुम्बाने ३२-२० च्या फरकाने सामन्यात बाजी मारली.