अमिताभ बच्चन यांच्या सुरांची साथ लाभलेल्या, सुधारित नियमांमुळे रोमहर्षकतेत पडणारी भर आणि चाहत्यांसाठी मनोरंजनाची भरगच्च पर्वणी ठरणाऱ्या प्रो-कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाचे गुरुवारी मुंबापुरीत बिगूल वाजले. आठ संघांच्या कर्णधारांच्या उपस्थितीत झळाळत्या चषकाचे अनावरण करण्यात आले. देशी खेळ असूनही अन्य खेळांच्या भाऊगर्दीत उपेक्षित राहिलेल्या कबड्डीला प्रो-कबड्डीच्या रूपाने नवा साज मिळाला. पहिल्या यशस्वी हंगामानंतर दुसऱ्या हंगामासाठी आठ संघ सज्ज झाले आहेत. दुसऱ्या हंगामातील पहिला टप्पा मुंबईतील एनएससीआय इनडोअर स्टेडियमवर सुरू होत असून, शुक्रवारी यजमान यू मुंबा आणि गतविजेते जयपूर पिंक पँथर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. बंगळुरू बुल्स, पाटणा पायरेट्स, तेलुगू टायटन्स, पुणेरी पलटण, दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स, यू मुंबा, जयपूर पिंक पँथर्स यांच्यात जेतेपदासाठी चुरशीची लढाई रंगणार आहे.
प्रो-कबड्डीच्या पहिल्या हंगामाला ४३ कोटी ५० लाख प्रेक्षकांची पसंती लाभली होती. यंदाही हे प्रेम कायम राहील, असा विश्वास स्टार स्पोर्ट्सचे प्रमुख नितीन कुकरेजा यांनी व्यक्त केला. प्रत्येक संघांना आपल्या ताफ्यात १४ ऐवजी २५ खेळाडू समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे. दुखापतींमुळे सांघिक समीकरणांवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे कुकरेजा यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या हंगामात, हिंदी आणि इंग्रजीच्या साथीने प्रेक्षकांना कन्नड, तेलुगू, मराठी भाषेत सामन्यांचे समालोचन ऐकता येणार आहे. सामने पाहताना खेळ समजायला मदत हवी यासाठी अत्याधुनिक ग्राफिक्स प्रेक्षकांच्या मदतीला असतील. तब्बल १०९ देशांत सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने कबड्डीला आंतरराष्ट्रीय क्षितिज लाभणार असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले. क्रीडा स्पर्धेच्या बरोबरीने पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी यंदा स्पर्धेदरम्यान ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजात राष्ट्रगीत
कबड्डीच्या चाहत्यांना अमिताभ बच्चन यांच्या सुरांची जादू अनुभवता येणार आहे. प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात अमिताभ यांच्या आवाजातील राष्ट्रगीताने होणार आहे. लीगच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी स्थानिक संगीतकार आणि बॅण्ड यांच्यातर्फे राष्ट्रगीताचे वादन होईल.
यंदा कडवी झुंज देऊ. अंतिम फेरी जिंकून विजेतेपद काबीज करू.
दिनेश कुमार,
बंगाल वॉरियर्स कर्णधार

प्रो कबड्डीने आम्हाला नवी ओळख दिली आहे. मागील वर्षी माझ्याकडून काही चुका झाल्या. मला योग्य खेळ साकारता आला नाही; परंतु या वेळी त्या उणिवांवर मात करू.
– मनजीत चिल्लर,
बंगळुरू बुल्सचा कर्णधार

मागील वर्षी आमच्याकडे एकाच बाजूने चढाई करणारे खेळाडू होते. या वेळी आम्ही त्यावर मात केली आहे. नव्या आशा आणि नवा जोश घेऊन आम्ही प्रो कबड्डीमध्ये उतरत आहोत.
– जसमेर सिंग,
दबंग दिल्लीचा कर्णधार

प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात मिळवलेले विजेतेपद टिकवण्याचे आव्हान आमच्यापुढे असेल.
– नवनीत गौतम,
जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार

ऑलिम्पिकचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही कबड्डी खेळतो. प्रो कबड्डीच्या यंदाच्या हंगामासाठी मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. संपूर्ण संघाच्या तंदुरुस्तीवर आम्ही सरावात मेहनत घेतली आहे.
– राकेश कुमार,
पाटणा पायरेट्सचा कर्णधार

महाराष्ट्रात सर्वात जास्त कबड्डीचे सामने होतात आणि सर्वात जास्त पाठीराखे इथे आहेत. पुण्याच्या संघाचे नेतृत्व करीत असल्याचा अभिमान वाटतो.
– वझीर सिंग,
पुणेरी पलटणचा कर्णधार

तंदुरुस्ती शिबिरात आम्ही चांगली मेहनत घेतली आहे. यंदाच्या हंगामात आम्ही जेतेपदाचा निर्धार केला आहे.
– राहुल चौधरी,
तेलुगू टायटन्सचा खेळाडू

यंदा आम्ही अधिक मेहनत केलेली आहे. सर्वोत्तम खेळ करून जेतेपद पटकावू.
जीवा कुमार, यु मुंबाचा खेळाडू