गणेशोत्सवासाठी अवघी नगरी सजली असताना प्रो-कबड्डी लीगच्या अखेरच्या टप्प्यातील चार सामन्यांसाठीही मुंबई सज्ज झाली आहे. आता मात्र प्रत्येक पाऊल हे चारही संघांसाठी आव्हानात्मक असेल. कारण साखळी फेरी संपल्यामुळे उपांत्य फेरीतील पराभव हा संघाचे आव्हान संपुष्टात येण्यासाठी पुरेसा ठरेल. प्रो-कबड्डीच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत आलेल्या नवनीत गौतमच्या नेतृत्वाखालील जयपूर पिंक पँथर्सचा भारतीय कर्णधार राकेश कुमारच्या नेतृत्वाखालील पाटणा पायरेट्शी गाठ पडणार आहे. याचप्रमाणे अनुप कुमारच्या कर्णधार असणारा यजमान यु मुंबाचा संघ मनजीत चिल्लरच्या बंगळुरू बुल्सशी सामना करणार आहे.
जयपूरने साखळीतील १४ सामन्यांपैकी १० विजयांसह ५४ गुण कमवत आपले वर्चस्व दाखवत बाद फेरी गाठली आहे. त्यामुळे पाटण्याविरुद्ध जयपूरचे पारडे जड आहे. याबाबत गौतम म्हणाला, ‘‘उपांत्य फेरीतील आमचे स्थान आधीच पक्के झाल्यामुळे अखेरच्या काही सामन्यांत खेळाडूंच्या दुखापती आणि तंदुरुस्ती यांची काळजी घेतली. त्यामुळे बंगळुरूविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात आम्ही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देऊन सावधपणे खेळलो. शेवटच्या मिनिटाला झालेल्या चुकीमुळे आम्ही फक्त एका गुणाने सामना गमावला.’’

आजचे सामने
जयपूर पिंक पँथर्स वि. पाटणा पायरेट्स
यु मुंबा वि. बंगळुरू बुल्स
वेळ : रात्री ८ वा.पासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स