करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात जिवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. नागरिकांनी या काळात घराबाहेर न पडता सरकारी यंत्रणांना मदत करावी असं आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सतत करत आहेत. मात्र या आवाहनानंतरही देशातील काही भागात नागरिक नियमांचा भंग करत रस्त्यावर येत आहेत. विनाकारण घराबाहेर पडत रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना, प्रो-कबड्डीतला मराठमोळा खेळाडू गिरीश एर्नाकने चांगलच सुनावलं आहे.

पुणेरी पलटण संघाचं प्रतिनिधीत्व करणारा गिरीश मुळचा कल्याणचा रहिवासी. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर तो आपल्या आधारवाडीतील घरातच आहे. “सध्याच्या काळात मी जास्तीत जास्त वेळ घरात राहून सरकारी यंत्रणांनी दिलेले नियम पाळण्याचा प्रयत्न करतोय. भाजीपाला किंवा अगदीच काही गरजेच्या वस्तू आणायच्या असतील तरच घराबाहेर पडावं. पण करोनाचं गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. घराबाहेर पडून गर्दी केल्यास याची लागण आपल्याला सहज होऊ शकते. अशा परिस्थितीत बाहेर फिरत असताना पोलिसांनी तुम्हाला हटकलं आणि मारलं तर मग त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. खबरदारी घेतली नाही, तर आपल्यालाही करोनाची लागण होईल”, अशा शब्दांत गिरीशने नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.

कोणत्याही खेळाडूसाठी आपला फिटनेस कायम राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत दुकानं बंद असल्यामुळे जे उपलब्ध होऊन त्यात आपण आपलं डाएट सांभाळत असल्याचं गिरीशने सांगितलं. याचसोबत फिटनेस कायम राखण्यासाठी गिरीश आपल्या आपल्या इमारतीचे सहा मजले चढणं-उतरणं करत असतो. यावेळी बोलत असताना कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर न पडता सरकारला मदत करावी असं आवाहनही गिरीशने केलं. सध्याच्या घडीला सर्व महत्वाच्या स्पर्धा करोनामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रो-कबड्डीच्या आगामी हंगामाबद्दलही सध्या साशंकता आहे.