News Flash

मुंबापुरीच्या साक्षीने पहिला प्रो-कबड्डी विजेता ठरणार

गेले सहा आठवडे आठ शहरांमध्ये प्रवास करून कोटय़वधी क्रीडारसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी प्रो-कबड्डी लीग अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे.

| August 31, 2014 03:13 am

गेले सहा आठवडे आठ शहरांमध्ये प्रवास करून कोटय़वधी क्रीडारसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी प्रो-कबड्डी लीग अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. रविवारी मुंबापुरीच्या साक्षीने प्रो-कबड्डीचा पहिलावहिला विजेता संघ झळाळता चषक उंचावेल. यजमान यु मुंबाचा संघ गुणतालिकेतील अव्वल स्थानासह बाद फेरी गाठणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सशी झुंजणार आहे.
यु मुंबाची मदार कर्णधार अनुप कुमार आणि रिशांक देवाडिगा यांच्या चढायांवर असेल. जयपूरचा कर्णधार नवनीत गौतम बचावाची धुरा सांभाळेल, तर जसवीर सिंग चतुरस्र चढायांनी प्रतिस्पध्र्याचे क्षेत्ररक्षण भेदण्यात वाकबदार आहे. याशिवाय मणिंदर सिंग व राजेश नरवाल यांच्यासारख्या चढाईपटूंची साथसुद्धा त्याला लाभते. त्यामुळे सांघिकदृष्टय़ा जयपूरचे पारडे जड आहे.
मुंबईतील सामन्यात यु मुंबाने जयपूरवर ४५-३१ असा विजय मिळवला होता. मग जयपूरला ३१-३१ असा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे आकडेवारी पाहता मुंबईला जिंकण्याची संधी आहे.
अंतिम फेरीचा सामना ‘हाऊसफुल्ल’
प्रो-कबड्डीच्या अंतिम फेरीचा सामना ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे. ‘बुक माय शो’ या वेबसाइटवर ऑनलाइन तिकीट विक्री उपलब्ध होती. पाच हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या एनएससीआय क्रीडा संकुलातील काही तिकीट्स फ्रेंचायझींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या बाकी सर्व तिकीट्स संपल्याची माहिती यजमान यु मुंबाकडून देण्यात आली.
वेळ : रात्री ८ वा.  ल्ल  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर

जयपूरचा संघ बलाढय़ आणि समतोल आहे. त्यांचा बचाव हा भक्कम आणि आक्रमणसुद्धा चांगले आहे. त्यामुळेच जयपूर हा धोकादायक संघ मानला जातो. परंतु आम्ही अंतिम सामना जिंकण्याच्या निर्धारानेच तयारी केली आहे.
-अनुप कुमार, यु मुंबाचा कर्णधार

पहिल्या सामन्यापासूनच मुंबईच्या संघाची कामगिरी चांगली होती. त्यांच्या संघात काही दर्जेदार खेळाडूंचा समावेश असल्याचे त्यांचे आव्हान कठीण आहे. परंतु आम्ही अंतिम सामन्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी योग्य तयारी केली आहे.
-नवनीत गौतम, जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:13 am

Web Title: pro kabbadi league u mumba to meet pink panthers in final
Next Stories
1 फिरकीच्या तालावर भारत विजयी
2 सिंधूला कांस्य!
3 सप्ततारांकित मुंबईबाहेर आयएसएलचे सामने
Just Now!
X