24 September 2020

News Flash

पदाधिकारी द्विधा, अन् आयोजकांची त्रेधा!

कुस्ती लीग आयोजनाबाबत दोन मराठी वाहिन्यांमध्येच जुंपल्याने शरद पवार यांच्या समितीसमोर समन्वयाचे आव्हान

|| धनंजय रिसोडकर

कुस्ती लीग आयोजनाबाबत दोन मराठी वाहिन्यांमध्येच जुंपल्याने शरद पवार यांच्या समितीसमोर समन्वयाचे आव्हान

इंडियन प्रीमियर लीग आणि प्रो कबड्डी लीगच्या यशस्वी अध्यायानंतर महाराष्ट्रात कुस्तीचीदेखील लीग भरवण्याचे प्रयत्न दोन मराठी वाहिन्यांच्या माध्यमातून सुरू आहेत. मात्र, दोन वाहिन्यांची स्पर्धा आणि कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमधील मतभिन्नतेमुळे आयोजकांची मात्र पुरती त्रेधातिरपीट उडाली आहे. अखेरीस दोघांच्या प्रस्तावानंतर प्रस्तावांवर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील समन्वय समिती आठवडाअखेपर्यंत निर्णय घेणार आहे.

कुस्ती लीगच्या आयोजनासाठी ‘झी टॉकीज’ आणि ‘कलर्स मराठी’ या दोन प्रमुख वाहिन्यांनी प्रस्ताव देत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील तारखादेखील निश्चित केल्या होत्या. दोन्ही वाहिन्या साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर या काळात स्पर्धा भरवण्याबाबत आग्रही असल्याने त्यांच्या तारखांमधील संभावित संघर्ष तसेच मल्ल विभाजित झाल्यास त्याचा स्पर्धाच्या दर्जावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा विचार करता एकच स्पर्धा भरवावी, असा काही पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. याचप्रमाणे एक स्पर्धा राज्यस्तरावरील मल्लांच्या सहभागाची आणि एक स्पर्धा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्लांच्या सहभागाची भरवावी, असादेखील विचार या वाहिन्यांच्या संचालकांसमोर मांडण्यात आला आहे.

बुधवारी रात्री झालेल्या या बैठकीत  दोन स्पर्धा कशा भरवल्या जाणार, संबंधित तांत्रिक, आर्थिक आणि कायदेशीर बाबींच्या अनुषंगाने कशी पूर्तता केली जाणार, याबाबत संबंधित वाहिन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साडेतीन तास मॅरेथॉन बैठक  पार पडली. दोन्ही वाहिन्यांच्या तज्ज्ञ संचालकांनी त्यांचे म्हणणे पवार आणि अन्य पदाधिकाऱ्यांसमोर मांडले. त्यानंतर दोन्ही वाहिन्यांना त्यांचे प्रस्ताव सविस्तर लिखित स्वरूपात दोन दिवसांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

त्यामुळे शुक्रवापर्यंत प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे घेतला जाणार आहे. या समितीमध्ये कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, काकासाहेब पवार, नामदेव मोहिते, सर्जेराव शिंदे, संजय शेटय़े आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पुढील पाच वर्षांचा कृतीआराखडा

कुस्तीविषयक तांत्रिक बाबींचे नियोजन कसे असेल, खेळाडूंच्या संघांची विभागणी, खेळाडूंचे मानधन, प्रशिक्षक आणि पंचांचे मानधन, वाहिनीवर कोणती वेळ दिली देणार, त्यांच्या सरावाची व्यवस्था, स्पर्धाचे संचलन कसे होणार? अशा सर्व बाबींवर पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा मागवण्यात आला आहे. तसेच मानधनांमध्ये पाच वर्षांत कशा प्रकारे वाढ केली जाणार? त्याचा उल्लेखदेखील प्रस्तावातच देण्यास संबंधित वाहिन्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रस्ताव कसे येतात, त्यावरच पुढील दिशा ठरणार आहे.

‘लीग’ नावाच्या वापराबाबत संदिग्धता

राष्ट्रीय कुस्ती महासंघाने कुस्ती लीग हे नाव आधीच अधिकृतरीत्या नोंदवले असल्याने ते नाव वापरण्याबाबत नंतर आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांनी शक्यतो ‘लीग’ या नावाचा वापर टाळावा, असे निर्देशदेखील त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या स्पर्धेला लीग नाव दिले जाण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी काही अन्य पर्यायांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:57 am

Web Title: pro wrestling league sharad pawar
Next Stories
1 भारताचा कॅनडावर दमदार विजय
2 भुवनेश्वर कुमारने फोन करुन ‘त्या’ रडणाऱ्या लहान मुलाची घातली समजूत
3 मुंबईकर रिशांक देवाडीगा प्रो-कबड्डीत उत्तर प्रदेश योद्धाचा कर्णधार
Just Now!
X