इंडिया खुली  बॉक्सिंग स्पर्धा

२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्लायवेट म्हणजेच ५१ किलो वजनी गटात भारताला कांस्यपदक मिळवून देणारी भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम आता याच वजनी गटात इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेद्वारे व्यावसायिक पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ऑलिम्पिक पात्रता फेरी लक्षात घेता, इंडिया खुल्या स्पर्धेत भारताचे ३५ पुरुष आणि ३७ महिला बॉक्सर नशीब अजमावणार आहेत. या स्पर्धेत जवळपास १६ देशांमधील २०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. मेरी कोमने जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतून माघार घेतली होती. ‘‘आता ५१ किलो या नव्या वजनी गटासाठी मी सज्ज होत आहे. इंडिया खुल्या स्पर्धेत मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझी तयारी कितपत झाली आहे, याचीही चाचपणी करणार आहे,’’ असे मेरी कोमने सांगितले.

‘‘या वर्षी ही स्पर्धा आसाममध्ये होत असल्याने मी अतिशय आनंदी आहे. ईशान्येकडील राज्यांनी देशाला अनेक चांगले खेळाडू दिले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा येथील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे,’’ असेही मेरीने सांगितले.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरता यावे, यासाठी भारताच्या अनेक पुरुष आणि महिला खेळाडूंनी आपल्या वजनी गटात बदल केला आहे.