जगभरासह भारतालाही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा चांगलाच फटका बसलेला आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाउनचा सामना क्रीडा विश्वालाही करावा लागला आहे. देशातील अनेक महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. क्रिकेट आणि अन्य खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. पण काही खेळाडूंवर करोनाने चांगलंच मोठं संकट आणलं आहे. नागपूरची उदयोनमुख धावपटू प्राजक्ता गोडबोले लॉकडाउन काळात करोना आणि भूक अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे.

२४ वर्षीय प्राजक्ता नागपूरमधील सिरसापेठ भागातील वस्तीमध्ये राहते. प्राजक्ताने आतापर्यंत २०१९ साली इटलीत झालेल्या World University Games मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ५ हजार मी. धावण्याच्या शर्यतीत या स्पर्धेत प्राजक्ताने १८:२३:९२ अशी वेळ नोंदवली. मात्र अंतिम फेरीत दाखल होण्यात तिला अपयश आलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या भुवनेश्वर हाफ मॅरेथॉनमध्येही प्राजक्ताने दुसरा क्रमांक पटकावला होता. प्राजक्ताचे वडील विलास गोडबोले हे सिक्युरिटी गार्डचं काम करत होते, मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे ते सध्या घरीच असतात. प्राजक्ताची आई स्थानिक केटरिंग व्यवसायात स्वयंपाक करण्याचं काम करते, ज्यातून तिला महिन्याकाठी ५ ते ६ हजाराचं उत्पन्न मिळतं. मात्र लॉकडाउ काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे गोडबोले कुटुंबासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.

“शेजारचे लोकं सध्या जी मदत करत आहेत, त्यावर आम्ही दिवस काढतोय. शेजारच्यांनी आम्हाला तांदूळ, डाळ व इतर गोष्टी दिल्या ज्यामुळे काही दिवस आम्ही जेवू-खाऊ शकलो. पण यानंतर काय होईल हे मला माहिती नाही. हा लॉकडाउनचा काळ आमची क्रूर चेष्ठा करत आहे. सध्या माझ्या मनात ट्रेनिंगचा विचारही येत नाही. या परिस्थितीमधून मी वाचेन की नाही हे देखील मला सांगता येत नाही. माझ्या परिवाराने आतापर्यंत बरंच सोसलं आहे, त्यात लॉकडाउनमुळे आमच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.” प्राजक्ता पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होती.

आमचा परिवार सध्या खूप खडतर काळातून जातो आहे. मी केटरिंगवाल्याकडे काम करायचे ज्याच्याकडून मला ५-६ हजार रुपये मिळायचे, पण आता लॉकडाउन काळात लग्नच होत नाहीयेत, सगळे व्यवहार ठप्प झाल्यामुळे आमच्यासमोर संकट उभं राहिलेलं आहे. उत्पन्नाचं कोणतंही साधन आमच्याकडे नाही आणि पैसेही संपत आलेले आहेत. अशा परिस्थितीत इतरांच्या मदतीवर आम्ही किती दिवस तग धरु याची शाश्वती देता येत नाही, प्राजक्ताची आई अरुणाने आपली व्यथा मांडली. अशा परिस्थितीत नेमकी कोणाकडे मदत मागायची हे देखील आपल्याला कळत नसल्याचं प्राजक्ताने पीटीआयशी बोलताना सांगितलं. त्यामुळे हे लॉकडाउन लवकरात लवकर संपू दे एवढीच प्रार्थना आपण करत असल्याचं प्राजक्ताने सांगितलं.