News Flash

२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स?? कुमार संगकाराची ५ तास कसून चौकशी

चाहत्यांची कार्यालयाबाहेर निदर्शनं, प्रकरणाला राजकीय रंग

श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा आरोप केला होता. या आरोपांनंतर श्रीलंकन क्रिकेटमध्ये वादळ निर्माण झालं होतं. लंकेच्या तत्कालीन संघातील कर्णधार कुमार संगकारा आणि महत्वाचा खेळाडू महेला जयवर्धने यांनी अलुथगमगे यांचे आरोप फेटाळून लावत, पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. श्रीलंकन सरकारनेही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अलुथगमगे यांनी केलेल्या आरोपांविषयी चौकशी सुरु केली आहे.

श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकाराची गुरुवारी क्रीडा मंत्रालयात ५ तास कसून चौकशी करण्यात आली. ही चौकशी सुरु असताना संगकाराच्या चाहत्यांनी क्रीडा मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. श्रीलंकन सरकार माजी खेळाडूंना त्रास देण्यासाठी ही चौकशी करत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

या प्रकरणाला श्रीलंकेत आता राजकीय रंग मिळायला सुरुवात झालेली आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधान पदासाठी शर्यतीत असलेल्या साजिथ प्रेमदासा यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कुमार संगकाराच्या चौकशीविषयी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.

आतापर्यंत क्रीडा मंत्रालयाने अलुथगमगे, तत्कालीन निवड समितीचे प्रमुख अरविंद डी-सिल्वा आणि उपुल थरंगा यांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यामुळे संगकाराच्या चौकशीनंतर याप्रकरणी लंकन क्रीडा मंत्रालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले होते महिंदानंद अलुथगमगे??

“२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.”

२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी २७५ धावांची गरज होती. महेला जयवर्धनेचं शतक आणि तिलकरत्ने दिलशान व कुमार संगकारा यांच्या फटकेबाजीमुळे लंकेच्या संघाने हा मोठा पल्ला गाठला. धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर हे महत्वाचे खेळाडू लवकर बाद झाले. मात्र यानंतर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनीने संघाजी बाजू सांभाळली. धोनीने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा षटकार खेचत पूर्ण केल्या आणि भारताने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 7:28 pm

Web Title: protest staged in sri lanka as kumar sangakkara grilled for more than 5 hours psd 91
Next Stories
1 Video : कहानी में ट्विस्ट! हार्दिकच्या ‘फ्लाईंग पुश-अप्स’ला विराटचं झकास उत्तर
2 आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर ! बीसीसीआय अधिकाऱ्याची माहिती
3 शशांक मनोहर भारत विरोधी काम करत होते, एन.श्रीनिवासन यांचा हल्लाबोल
Just Now!
X