कामगार कायद्यातील सुधारणेच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलकांनी बुधवारी ‘युरो २०१६’ फुटबॉल स्पध्रेचा चषक अडवला. युरो स्पध्रेचे आयोजन करणाऱ्या दहा शहरांसह एकूण २५ ठिकाणांना भेट देऊन चषकासह निघालेली रेल्वेगाडी बुधवारी पॅरिस गॅरे डू नॉर्ड स्थानकावर पोहोचली असता हा प्रसंग घडला.
या चषकासह एरवी चाहत्यांना छायाचित्रही काढू दिले जाते, परंतु आंदोलकांमुळे चषकाला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली. शुक्रवारी युरो स्पध्रेला सुरुवात होणार असली तरी फ्रान्स सरकारविरोधात असलेल्या सामाजिक तणावाचा फटका स्पध्रेला बसण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांचे हे आंदोलन आणि निदर्शने सुरू आहेत. फ्रान्स फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष लोएल ले ग्रॅएट यांनी कामगारांना हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. ‘‘या आंदोलनामुळे देशाची वाईट प्रतिमा जगासमोर निर्माण होत आहे. फुटबॉल हा सर्वाना एकत्र आणतो. हा जगातील सर्वाधिक प्रसिद्ध खेळ आहे,’’ असे ग्रॅएट म्हणाले.