युरोपियन स्पध्रेतील विजेत्या बार्सिलोना क्लबला आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पध्रेत मँचेस्टर युनायटेडकडून पराभव पत्करावा लागला. ८व्या मिनिटाला हेडरद्वारे व्ॉन रुनीने पहिला गोल केल्यानंतर युनायटेडने सांघिक खेळाचा नजराणा सादर करून ३-१ असा दणदणीत विजय साजरा केला.

रुनीने सुरुवातीला गोल केल्यानंतर युनायटेडने मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी कायम राखली होती. मध्यंतरानंतर बार्सिलोनाकडून आक्रमक खेळ झाला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. लिओनेल मेस्सी आणि नेयमार यांच्या अनुपस्थितीत उतरलेला बार्सिलोना क्लब या लढतीत हतबल दिसला. ६५व्या मिनिटाला टेलर ब्लॅकेटच्या क्रॉसवर जेस्से लिंगार्डने गोल करून युनायटेडची आघाडी वाढवली. ९०व्या मिनिटाला अ‍ॅडनॅन जॅनु झालने युनायटेडसाठी तिसरा गोल केला. त्यानंतर ३० सेकंदाच्या आत रॅफिन्हाने एकमेव गोल करून ६८,४१६ प्रेक्षकांसमोर होणारी बार्सिलोनाची नाचक्की टाळण्याचा प्रयत्न केला.

युनायटेडचा पुढील सामना बुधवारी पॅरिस सेंट जर्मेन संघाविरुद्ध आहे, तर बार्सिलोनासमोर गुरुवारी इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेता चेल्सीचे आव्हान आहे. रुनीच्या गोलने त्याला फॉर्म परत आल्याचे संकेत दिले आहेत. पुढील महिन्यात इंग्लिश प्रीमिअर लीगला (ईपीएल) सुरुवात होत असून रुनीचा फॉर्म परत आल्याने संघात आनंदाचे वातावरण आहे. ईपीएलमध्ये युनायटेडसमोर टोटेन्हॅम हॉटस्पूरचे पहिले आव्हान आहे.