१३ जूनच्या मैदानावरील आणखी दोन घटना

अबू धाबी : पाकिस्तान सुपर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात अन्य क्षेत्ररक्षकाशी धडकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फाफ डय़ूप्लेसिसला शनिवारी रुग्णालयात नेण्यात आले. पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना क्वेट्टा ग्लॅडिएटर्सच्या डय़ूप्लेसिसची मोहम्मद हसनैनशी अनवधानाने धडक बसली. या घटनेनंतर डय़ूप्लेसिस मैदानावर कोसळला आणि काही मिनिटे तसाच पडून होता. मग प्राथमिक उपचारानंतर डय़ूप्लेसिस डगआऊटकडे परतला. मग त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पेशावरच्या डावाच्या १९व्या षटकात सीमारेषेपाशी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात डय़ूप्लेसिसचे डोके हसनैनच्या गुडघ्यावर आदळले.  ‘‘या घटनेने मी पुरती हादरली आहे. फाफची रुग्णालयात नेऊन तपासणी करण्याची आवश्यकता आहे?’’ असे डय़ूप्लेसिसची पत्नी इमारीने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.

रोसेनक्विस्टचा अपघात

डेट्रॉइट : स्वीडनचा कारचालक फेलिक्स रोसेनक्विस्टचा इंडिकार शर्यतीदरम्यान अपघात झाला असून त्याला डीएमटी डेट्रॉइट रुग्णालयात दाखल केले आहे. बेले आइल पार्कमध्ये सहाव्या वळणावर सुसाट वेगाने येणाऱ्या रोसेनक्विस्टला आपली कार थांबवता आली नाही अथवा वेग कमी करता आला नाही. परिणामी त्याची कार दुभाजकावर आदळली. पण त्याच्या कारचा वेग जास्त असल्यामुळे ती पुढे जाऊन भिंतीवर आदळली. आता रविवारच्या शर्यतीत ऑलिव्हर आस्क्यूला संधी देण्यात आल्याचे अ‍ॅरो मॅकलॅरेन एसी संघाकडून सांगण्यात आले.