पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धा अबुधाबी येथे खेळली जात आहे. या स्पर्धेत क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यात मंगळवारी सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद आणि शाहीन अफरीदी यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना इशारे दाखवत आक्रमक बाणा दाखवला. हे प्रकरण वाढत असल्याचं दिसताच पंच आणि लाहोर कलंदर्सचा कर्णधार सोहेल अख्तर यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर प्रकरण शांत झालं.

लाहोर कलंदर्सकडून खेळत असलेल्या शाहीन अफरीदीला संघाचं १९ वं षटक सोपवण्यात आलं होतं. तेव्हा स्ट्राईकवर सरफराज फलंदाजी करत होता. यावेळी शाहीनने भेदक गोलंदाजी करत बॉउन्सर फेकला. हा चेंडू थेट सरफराजच्या हेल्मेटला जाऊन आदळला आणि सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या खेळाडूकडे गेला. तेव्हा सरफराजने एक धाव घेत नॉन स्ट्राईकजवळ गेला आणि शाहीनला काहीतरी बोलला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक रंगली. अफरीदी सरफराजच्या अंगावर धावून गेला. तेव्हा प्रकरण तापल्याचं पाहून पंच आणि लाहोरचा कर्णधार सोहेल अख्तर यांनी हस्तक्षेप केला आणि भांडण सोडवलं. शाहीन अफरीदीने टाकलेला चेंडू पंचांनी नो बॉल दिला होता.

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर शाहीन अफरीदीविरोधात तक्रारीचा सूर उमटला आहे. मात्र हा फक्त खेळचा भाग असल्यचं स्पष्टीकरण शाहीन अफरीदीने नंतर दिलं. सरफराजने या सामन्यात २७ चेंडूत ३४ धावा केल्या.

WTC Final: न्यूझीलंडच्या ६ सदस्यांनी मोडले बायो-बबलचे नियम!; बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार

दरम्यान क्वेटा ग्लॅडिएटर्सने लाहोर कलंदर्सला १८ धावांनी पराभूत केलं. क्वेटा ग्लॅडिएर्सने २० षटकात ५ गडी गमवून १५८ धावा केल्या होत्या. मात्र लाहोर कलंदर्सचा संघ १८ षटकात सर्वबाद १४० धावांपर्यंत मजल मारू शकला.