पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) सहावे पर्व पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत पीएसएल तातडीने पुढे ढकलण्यात येत असल्याचं पीसीबीने स्पष्ट केलं आहे. मंगळवारी पीसीबीने आयोजक आणि संघ मालकांची बैठक घेतली त्यानंतर ही घोषणा करण्यात आलीय. या मालिकेशी संबंधित तीन जण करोनाबाधित आढळल्यामुळे तातडीची बैठक बोलवण्यात आली. करोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांमध्ये कोट्टा ग्लॅडिएटर्सचा फलंदाज टॉम बाटोन आणि कराची किंग्सचे फिल्डिंग कोस कमरान खान या दोघांचाही समावेस आहे. त्यापूर्वी इस्लामाबाद युनायटेडचा फवाद अहमदही करोना पॉझिटिव्ह आढळून आलेला. यामुळे एक सामानाही पुढे ढकलण्यात आला होता.

पीसीबीने जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यामध्ये पीएसएलमध्ये आतापर्यंत सात जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ही मालिका २० फेब्रुवारी रोजी सुरु झाली असून ३४ पैकी केवळ १४ सामने आतापर्यंत झाले आहेत. त्यानंतरचे सामने पुढे ढकलण्यात आलेत. मात्र या निर्णयामुळे पीसीबीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे आणखीन एका मुद्द्यावरुन पीसीबी आणि पीएसएलची नाचक्की होत आहे. इंग्लंडचा क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हेल्सने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल केलं आहे. इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज असणारा अ‍ॅलेक्स हा इस्लामाबाद युनायडेट टीमचा भाग आहे. अ‍ॅलेक्सने इन्ताग्रामवर या मालिकेच्या आयोजकांकडून खेळाडूंना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचा फोटो पोस्ट करत मजेशीर टोमणा मारला आहे. या फोटोमध्ये एका पार्सलच्या कंटेनरमध्ये दोन उकडलेली अंडी आणि ब्रेड दिसत आहेत.

अ‍ॅलेक्स हेल्सला या पाकिटामध्ये दोन अंडी जेवण म्हणून दिली असतील असं वाटलं नव्हतं. तसेच देण्यात आलेल्या अंड्यांचा दर्जाही फारसा छान असल्याचे वाटत नसल्याने अ‍ॅलेक्स उपहासात्मक फटकेबाजी केली. हेल्सने टोस्ट, ऑमलेट अ‍ॅण्ड बेक बिन्स, असं लिहून या कंटेनरचा फोटो पोस्ट केला होता. विशेष म्हणजे या फोटोतील ब्रेड भाजण्यात आला नव्हता त्यामुळे तो टोस्ट ब्रेड नव्हता, तसेच अंड्यांच्या ऑमलेटऐवजी ती उकडून देण्यात आली होती आणि बिन्स या फोटोमध्ये नव्हत्याच. अ‍ॅलेक्सने मुद्दाम या अंड्यांच्या कंटेनरच्या फोटोवर त्यामध्ये जे पदार्थ असणं अपेक्षित होतं त्यांची नावं लिहिली होती.

मात्र हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका ट्विटवर अ‍ॅलेक्सने या फोटोसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आङे. “मी चुकीची ऑर्डर दिली होती. मला ते बॉक्स उघडल्यानंतर अगदीच मजेशीर वाटलं. बाकी यामध्ये काहीही विशेष नाही. येथील जेवण आणि इतर सेवा अगदी उत्तम आहेत. यासंदर्भातील तुमची शंका दूर झाली असेल अशी अपेक्षा आहे,” असं ट्विट अ‍ॅलेक्सने केलं आहे.

दरम्यान मागील वर्षीही पीसीएलचे पर्व पुढे ढकलण्यात आलं होतं. मागील वर्षी म्हणजेच २०२० चं पर्व नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात आलेलं. त्याचप्रमाणे आता २०२१ चं उर्वरित पर्व लवकरच आयोजित करण्याचा पासीबीचा विचार आहे. मागील वर्षाप्रमाणे उशीरा आयोजन केलं तरी स्पर्धेला यश मिळावं अशीच अपेक्षा पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला आहे.