नवी दिल्ली : भारताची अव्वल धावपटू पी. टी. उषा यांचा अ‍ॅथलेटिक्समधील उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (आयएएएफ) ज्येष्ठ मानद खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारताची सवरेत्कृष्ट धावपटू तसेच ‘अ‍ॅथलेटिक्सची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी. टी. उषा यांचा आंतरराष्ट्रीय महासंघाकडून विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे. ‘‘जागतिक अ‍ॅथलेटिक्ससाठी दिलेल्या प्रदीर्घ आणि मैत्रीपूर्ण सेवेबद्दल पी. टी. उषा यांचा आयएएएफच्या ‘वेटरन पिन’साठी म्हणजेच ज्येष्ठ मानद खेळाडूंमध्ये समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे,’’ असे आयएएएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन रिडजेन यांनी उषा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सप्टेंबर महिन्यात कतार येथे होणाऱ्या आयएएएफच्या ५२व्या वार्षिक परिषदेदरम्यान ५५ वर्षीय उषा यांचा सत्कार केला जाणार असून त्या कार्यक्रमाचे निमंत्रणही त्यांना पाठवण्यात आले आहे. ‘‘२४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ५२व्या वार्षिक परिषदेदरम्यानच्या सत्कार सोहळ्याला उषा यांना निमंत्रित करताना आनंद होत आहे,’’ असेही जॉन यांनी म्हटले आहे.

उषा यांनी १९८४च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत संस्मरणीय कामगिरी केली होती. ४०० मीटर अडथळा शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली महिला धावपटू ठरली होती. मात्र उषा यांना एक-शतांश सेकंदाने कांस्यपदकाने हुलकावणी दिली होती. उषा यांनी ‘ट्विटर’द्वारे जागतिक महासंघाचे आभार मानले आहेत. ‘‘जागतिक अ‍ॅथलेटिक्ससाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आयएएएफने वेटरन पिनसाठी माझी निवड केली आहे. या अविश्वसनीय सन्मानाबद्दल आयएएएफचे आभार,’’ असे उषा यांनी म्हटले आहे.