News Flash

युनायटेडचा बोलबाला!

देश विरुद्ध क्लब हा वाद युरोपियन फुटबॉल संघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. देशातर्फे खेळताना फुटबॉलपटूंची कामगिरी खालावते, पण इंग्लिश प्रीमिअर लीग किंवा स्पॅनिश लीग फुटबॉल

| April 28, 2013 01:37 am

देश विरुद्ध क्लब हा वाद युरोपियन फुटबॉल संघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. देशातर्फे खेळताना फुटबॉलपटूंची कामगिरी खालावते, पण इंग्लिश प्रीमिअर लीग किंवा स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धामध्ये खेळताना हेच खेळाडू सरस कामगिरी करतात, आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करतात, यामुळे या वादात आणखी भर पडत जाते. ब्राझीलमध्ये होणारी फिफा विश्वचषक स्पर्धा आणि त्यासाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धा ऐन तोंडावर आल्या असताना विविध क्लबचे प्रतिनिधित्व करणारे काही फुटबॉलपटू ऐन फॉर्मात आहेत, तर काहींना दुखापतींनी घेरले आहे. पण दुखापती कुरवाळत बसण्याऐवजी ते क्लबला प्रथम प्राधान्य देताना दिसून येते.
खरं तर इंग्लिश प्रीमिअर लीग आणि स्पॅनिश लीग या युरोपातील दोन नावाजलेल्या स्पर्धा. पण लोकप्रियतेच्या बाबतीत ईपीएलने गेल्या काही वर्षांत स्पॅनिश लीगवर सरशी साधली. या मोसमाचा ईपीएलचा थरार फारसा रंगला नाही. याचे श्रेय मँचेस्टर युनायटेडच्या सरस कामगिरीला जाते. गेल्या वर्षी अखेरच्या सामन्यापर्यंत जेतेपदाचा थरार रंगला होता. शेवटच्या क्षणी मँचेस्टर सिटीने गोलफरकाच्या आधारावर मँचेस्टर युनायटेडला मागे टाकून ईपीएलचे जेतेपद पटकावले होते. या वर्षी जेतेपद पटकावण्यासाठी सिटी, अर्सेनल, चेल्सी, टॉटनहॅम या बलाढय़ संघांनी कंबर कसली होती. पण अखेर मँचेस्टर युनायटेड आणि सर अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांचाच बोलबाला राहिला. मँचेस्टर युनायटेडने चार सामने राखून ईपीएलचे २०वे जेतेपद पटकावले. सर्वाधिक जेतेपदे पटकावणारा मँचेस्टर युनायटेड हा ईपीएलमधील पहिला संघ ठरला. इंग्लिश फुटबॉलमध्ये जेतेपदासाठी धडपडणाऱ्या युनायटेडने १९६६-६७मध्ये सातव्यांदा अजिंक्य होण्याचा मान मिळवला. पण प्रीमिअर लीगच्या स्थापनेपासून १९९२-९३मध्ये युनायटेडने जेतेपदांचा सपाटा लावला तो आजतागायत कायम आहे. याचे श्रेय अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांनाच जाते. १९८६मध्ये त्यांनी युनायटेडच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली आणि आतापर्यंत युनायटेडने भल्याभल्या संघांना पाणी पाजत तब्बल १३ जेतेपदे मिळवली.
गेल्या वर्षी शेवटच्या क्षणी जेतेपद हातातून निसटल्याचे शल्य पचवून युनायटेडने २०१२-१३ मोसमाला सुरुवात केली खरी. पण पहिल्याच सामन्यात एव्हटरनसारख्या दुबळ्या संघाकडून युनायटेडला ०-१ अशी हार सहन करावी लागली. युनायटेडने कडवा संघर्ष केला. रॉबिन व्हॅन पर्सी या नव्या करारबद्ध खेळाडूला त्यांनी दुसऱ्या सत्रात उतरविले. हुकुमी अस्त्र असलेला व्हॅन पर्सी मात्र या सामन्यात प्रभाव पाडू शकला नाही. पराभवाने सुरुवात ही युनायटेडसाठी धोक्याची घंटा होती. पण ‘अपयश ही यशाची पहिली पायरी’ असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय पुढील लढतींमध्ये दिसून आला. युनायटेडने पुढील २९पैकी २५ लढती जिंकून आपला दबदबा सिद्ध केला. ऑक्टोबरच्या अखेरीस (नवव्या लढतीआधी) चेल्सी संघ युनायटेडला चार गुणांनी मागे टाकून आघाडीवर होता. चेल्सी आणि युनायटेडविरुद्धच्या सामन्यात ६० मिनिटांपर्यंत २-२ अशी बरोबरी असताना जेवियर हेर्नाडेझने गोलक्षेत्राच्या जवळून गोल झळकावला आणि युनायटेडला विजय मिळवून दिला. हा गोल ‘ऑफसाइड’ असल्याचा दावा चेल्सीचे प्रशिक्षक रॉबेटरे डी मटेओ यांनी केला. चेल्सीचा हा मोसमातील पहिलाच पराभव ठरला. त्यानंतर चेल्सीची गुणतालिकेत घसरण होत गेली.
गेल्या मोसमाच्या तुलनेत या वर्षी युनायटेडच्या कामगिरीत सातत्य दिसून आले. या मोसमाच्या पहिल्या टप्प्यातील सिटी आणि युनायटेड या बलाढय़ संघांमधील बहुचर्चित लढतीत सिटीने विजय मिळवल्यास दोन्ही संघांचे समान गुण होणार होते. पण अखेरच्या क्षणी निर्णायक गोल करून युनायटेडने विजय मिळवला. त्याच वेळेला युनायटेडचे ईपीएलचे जेतेपद निश्चित झाले होते. ३१व्या लढतीत मँचेस्टर युनायटेडने संडरलँडवर मात करून जेतेपदाच्या दिशेने कूच केली होती. पण पुढील लढतीत मँचेस्टर सिटीने युनायटेडवर सरशी साधून जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले. पण सिटीला जेतेपद राखण्यासाठी चमत्काराची अपेक्षा होती, तर युनायटेडला काही सामने जिंकायचे होते.
अखेर गेल्या रविवारी मँचेस्टर सिटीला टॉटनहॅमकडून पराभूत व्हावे लागले. पुढच्या दिवशी रॉबिन व्हॅन पर्सीने झळकावलेल्या या मोसमातील पहिल्या हॅट्ट्रिकमुळे युनायटेडने अ‍ॅस्टन व्हिलावर ३-० असा सहज विजय मिळवला आणि १३ गुणांच्या फरकाने चार सामने राखून जेतेपदावर नाव कोरले. जेतेपदांवर मँचेस्टर युनायटेडचा बोलबाला असला तरी पुढील मोसमात त्यांना हरवण्यासाठी मँचेस्टर सिटी, चेल्सी, अर्सेनल आणि टॉटनहॅम या तगडय़ा संघांना आतापासूनच रणनीती आखावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2013 1:37 am

Web Title: publicity of united
टॅग : Football,Sports
Next Stories
1 भारताचे आव्हान संपुष्टात
2 आज फैसला!
3 पुणे व जळगाव यांच्यात अंतिम लढत
Just Now!
X