विजय हजारे क्रिकेट स्पर्धा

पृथ्वी शॉ याने गुरुवारी विजय हजारे करंडक ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. पृथ्वीने १५२ चेंडूंत ३१ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने उभारलेल्या नाबाद २२७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने ४ बाद ४५७ धावांचा विक्रमी डोंगर उभारला. त्यामुळे ड-गटात मुंबईने पुदुचेरीवर २३३ धावांनी दिमाखदार विजय नोंदवला.

२१ वर्षीय पृथ्वीने हजारे क्रिकेटमधील संजू सॅमसनचा सर्वोच्च वैयक्तिक धावांचा विक्रम मोडीत काढला. सवाई मानसिंग स्टेडियमवर नाणेफेक जिंकल्यावर मुंबईला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय पुदुचेरीसाठी महागात पडला. पृथ्वीने आदित्य तरेच्या (५६) साथीने दुसऱ्या गडय़ासाठी १५३ धावांची भागीदारी केली. मग पृथ्वी आणि सूर्यकुमार यादव (५८ चेंडूंत २२ चौकार आणि ४ षटकारांसह १३३ धावा) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी २०१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पृथ्वी-सूर्यकुमारने पुदुचेरीच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. त्यानंतर, फिरकी गोलंदाज प्रशांत सोलंकीच्या (४८ धावांत ५ बळी) माऱ्यापुढे पुदुचेरीने हाराकिरी पत्करली आणि ३८.१ षटकांत २२४ धावसंख्येवर पुदुचेरीचा डाव गुंडाळला.

२२७* हजारे करंडक क्रिकेटधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी पृथ्वीने नोंदवली.

४ हजारे करंडक क्रिकेटमधील हे चौथे द्विशतक ठरले.

४५७ हजारे करंडक क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मुंबईने प्रस्थापित केला. पाच दिवसांपूर्वी झारखंडने मध्य प्रदेशविरुद्ध ४२२ धावांचा निर्माण केलेला विक्रम मोडीत काढला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : ५० षटकांत ४ बाद ४५७ (पृथ्वी शॉ नाबाद २२७, सूर्यकुमार यादव १३३; पंकज सिंग २/७९) विजयी वि. पुदुचेरी : ३८.१ षटकांत सर्व बाद २२४ (दामोदरन रोहित ६३; प्रशांत सोलंकी ५/४८)

केदार जाधवच्या नाबाद शतकामुळे महाराष्ट्राचा विजय

जयपूर : केदार जाधवच्या नाबाद शतकामुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पध्रेत गुरुवारी राजस्थानवर ४४ धावांनी विजय मिळवला. ड-गटात समावेश असलेल्या राजस्थानने नाणेफेक जिंकल्यावर महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर यश नाहर (५५), जाधव आणि सत्यजित बच्छाव (४४) यांच्या दिमाखदार फलंदाजीमुळे महाराष्ट्राने ६ बाद २७७ धावा उभारल्या. जाधवने ९३ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानचा डाव ४८.१ षटकांत २३३ धावांत आटोपला. महाराष्ट्राकडून मध्यमगती गोलंदाज प्रदीप दाढेने ४८ धावांत ४ बळी घेतले, तर मुकेश चौधरीने ३३ धावांत २ बळी घेतले.