भारतीय कसोटी संघात स्थिरस्थावर झालेल्या चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाची बुधवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खरी कसोटी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघाकडून हार पत्करली होती. या पाश्र्वभूमीवर मायदेशात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या अनधिकृत मालिकेमध्ये पराभवाचे उट्टे फेडण्याचे आव्हान पुजाराच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर असेल.
‘धावांची फॅक्टरी’ असे बिरुद मिरविणाऱ्या सौराष्ट्रच्या पुजारासाठी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धची मालिका फलदायी ठरली होती. गंगोत्री ग्लँड्स येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत आपला हाच फॉर्म कायम राखण्यासाठी पुजारा उत्सुक आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये मोठय़ा वैयक्तिक धावसंख्या रचून पुजारा सातत्याने क्रिकेटजगताचे लक्ष वेधून घेत आहे. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धसुद्धा त्याने लाजवाब शतकी खेळी साकारली होती. त्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातसुद्धा त्याने सलामीवीर म्हणून ५४ धावांची खेळी पहिल्या डावात उभारली होती.
पुजाराच्या खात्यावर १३ कसोटी सामन्यांध्ये ६५.५५च्या धावसरासरीने ११८० धावा जमा आहेत. परंतु आता पुजाराला नेतृत्वाचे कौशल्य दाखवण्याचीही संधी चालून आली आहे. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धची मालिका बरोबरीत सुटली होती. पुजाराने भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व करताना पहिल्या कसोटीत एक डाव आणि १३ धावांनी विजय मिळवला होता. परंतु दुसरी कसोटी भारताने १२१ धावांनी गमावली होती.