चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा खेळाडू मानला जातो. राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर, तिसऱ्या क्रमांकाची जागा कोण भरुन काढणार असा प्रश्न सर्वांसमोर होता. मात्र आपल्या तंत्रशुद्ध आणि मजबूत बचावात्मक फलंदाजीच्या जोरावर पुजाराने संघातलं आपलं स्थान बळकट केलं. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पुजाराचं नाव कधीच शर्यतीत नसलं तरीही कसोटी संघात पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार हे जवळपास ठरलेललच असतं. राहुल द्रविडनेही पुजाराच्या खेळीचं कौतुक करत, तो फिरकीपटूंना आपल्यापेक्षा जास्त चांगलं खेळतो असं त्याने म्हटलंय.

“पुजारा फिरकीपटूंविरोधात कमालीचा खेळतो. तो सुरुवात हळु करतो हे खरं असलं तरीही, ज्यावेळी तो मैदानात पूर्णपणे स्थिरावतो तो इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा फिरकीपटूंचा चांगला सामना करतो. खरं सांगायला गेलं तर तो माझ्यापेक्षा चांगलं खेळतो. ज्यावेळी फिरकीपटूंचा चांगला सामना करणं म्हणजे पुढे येऊन चौकार-षटकार मारणं असा होत नाही. धावफलक हलता ठेवणं हे देखील महत्वाचं काम असतं, तो खेळताना आपल्या पायांचा चांगला वापर करतो. नॅथन लॉयनविरुद्ध फलंदाजी करताना मी त्याला पाहिलं आहे. ज्या पद्धतीने तो पुढे येऊन फटके खेळतो आणि एक धाव घेतो हे पाहण्यासारखं असतं. असं खेळणं फार कमी लोकांना जमतं.” राहुल द्रविड संजय मांजरेकर यांच्यासोबत ESPNCricinfo च्या पॉडकास्टमध्ये बोलत बोता.

माझ्यामते पुजाराला ही गोष्ट जाणून आहे की तो भारताकडून फक्त कसोटी क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे वर्षभरात त्याला जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न तो करत असतो. यापाठीमागे त्याची मेहनतही असल्याचं द्रविडने सांगितलं. आयपीएलसारख्या स्पर्धेत वारंवार पुजाराला डावललं जात असतानाही तो निराश न होता काऊंटी क्रिकेट खेळत आपला सराव कायम सुरु ठेवत असतो. सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या कालात पुजारा आपल्या घरी राहून परिवारासोबत वेळ घालवत आहे.