बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रविंद्र जाडेजा, स्मृती मंधाना आणि दिप्ती शर्मा या ५ खेळाडूंना NADA अर्थात National Anti Doping Agency ने नोटीस पाठवली आहे. आपण राहत असलेल्या ठिकाणीची माहिती न दिल्याच्या कारणावरुन ही नोटीस पाठवण्यात आल्याचं समजतंय. बीसीसीआयने मात्र या प्रकरणी तात्काळ मध्यस्थी करत ‘पासवर्ड ग्लिच’ चं कारण देत खेळाडूंचा बचाव केला आहे. ‘नाडा’च्या डोपिंगविरोधी प्रणालीमध्ये प्रत्येक खेळाडूंना आपल्या राहत्या घराचा पत्ता देणं भाग असतं. एकतर खेळाडू स्वतः आपली माहिती देतात किंवा संस्था आपल्या खेळाडूंची माहिती ‘नाडा’च्या सॉफ्टवेअरमध्ये अ‍ॅड करत असते. ‘नाडा’ने यासाठी सर्व क्रीडा संघटनांना आपली ADAMS हे सॉफ्टवेअर दिलं आहे.

बीसीसीआयने आपल्या पाचही खेळाडूंचा बचाव करताना, पासवर्ड ग्लिचचं कारण दिलं आहे. नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी बीसीसीआयने खेळाडूंची माहिती देण्यासाठी उशीर झाला याबद्दल स्पष्टीकरण दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “काही खेळाडूंना ही माहिती देण्याबद्दल पुरेसं ज्ञान नसतं किंवा त्यांच्याकडे ती सोय नसते. अशावेळी त्यांची संघटना ही माहिती नाडाला देत असते. पण बहुतांश सर्व क्रिकेटपटू हे सुशिक्षित आहेत आणि त्यांना तांत्रिक गोष्टींची माहितीही आहे. पण कदाचीत या कामासाठी वेळ नसल्यामुळे खेळाडू ही माहिती देत नाही. अशावेळी बीसीसीआयने ही माहिती देण्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे बीसीसीआयने दिलेलं स्पष्टीकरण कितपत योग्य आहे याचा तपास केला जाईल.” अग्रवाल यांनी ‘नाडा’ची बाजू मांडली.