विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीमध्ये पराभवाचं पाणी पाजत ऐतिहासीक विजयाची नोंद केली आहे. 1947 सालापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यापासून भारताचा ऑस्ट्रेलियाच्या भूमितला हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने बाजी मारली आहे. चारही सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या नाकीनऊ आणणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीर आणि मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयन चॅपल यांनीही चेतेश्वर पुजाराच्या खेळीचं कौतुक केलं आहे. पुजाराने एकट्याच्या जिवावर कांगारुंना गुडघे टेकवण्यास भाग पाडल्याचं चॅपल यांनी म्हटलं आहे.

“विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा नायक आहे. मात्र चेतेश्वर पुजाराने वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. भारतीय संघासाठी या मालिकेत अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. पुजाराने ज्या पद्धतीने खेळपट्टीवर तग धरला तो पाहण्यासारखा होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना गुडघे टेकवायला भाग पाडण्यात पुजारा यशस्वी झाला. याचसोबत पुजाराने भारताच्या विजयाचा मार्ग तयार केला. 1977-78 साली सुनिल गावसकरांनी ज्या तडफेने ऑस्ट्रेलियत फलंदाजी केली होती, त्याच तोडीचा खेळ पुजाराने या मालिकेत ऑस्ट्रेलियामध्ये केला आहे.” EspnCricinfo संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत चॅपल बोलत होते.

अवश्य वाचा – भारताची तपश्चर्या फळाला, कांगारुंच्या भूमीत भारताने कसोटी मालिका जिंकली

ऑस्ट्रेलियन संघाने विराट कोहलीला थोपवून धरण्यासाठी रणनिती आखली, मात्र चेतेश्वर पुजाराने पाठीमागून येऊन यजमान देशाच्या सर्व रणनिती फोल ठरवल्या. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आपल्या घरच्या मैदानावर मला अपयशी ठरलेले पहायला मिळाले. चॅपल यांनी चेतेश्वर पुजाराच्या खेळीचं कौतुक केलं. कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराट भारताचा सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो – सुनिल गावसकर