दुखापतींनी असंख्य भारतीय बॅडमिंटनपटूंना गेल्या वर्षभरात ग्रासले आहे. मात्र तरीही किमान सात बॅडमिंटनपटू रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील, असा विश्वास भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केला.

‘‘पात्रतेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांत सरावाला सुरुवात होईल. पाच स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी आहे. मात्र स्पर्धापेक्षा सरावाला प्राधान्य असेल. किदम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, मनू अत्री हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतील,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘गेल्या काही महिन्यांमध्ये खेळाडूंना दुखापतींनी सतवले आहे. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे उद्दिष्ट समोर असल्याने ते सातत्याने खेळत आहेत. एकदा हे उद्दिष्ट पार केल्यानंतर सर्वच बॅडमिंटनपटूंना सरावासाठी चार आठवडे मिळू शकतात. दोन आठवडे स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी मिळू शकतात. त्यानंतर पुन्हा सहा आठवडय़ांचा कालावधी आहे जो सरावासाठी महत्त्वाचा असेल.’’

दुखापतीमुळे कश्यपची ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शक्यता मावळली आहे. त्याविषयी विचारले असता गोपीचंद म्हणाले, ‘‘हा खेळाडूंचा आयुष्याचा भाग आहे. मात्र दुखापतीमुळे एवढय़ा मोठय़ा स्पर्धेला मुकावे लागणे निराशाजनक आहे.’’

‘‘ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी प्रकारात दोन सामन्यांत दमदार कामगिरी भारतीयांसाठी पदक पक्के करू शकते,’’ असा विश्वास गोपीचंद यांनी व्यक्त केला. ‘‘किम तान हर हे दुहेरी विशेषज्ञ प्रशिक्षक दुहेरीच्या खेळाडूंसह स्पर्धाच्या वेळी उपस्थित असतात. दुहेरीच्या खेळाडूंच्या कामगिरीकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.