जम्मू कश्मीरमधील पुलवामामध्ये ‘जैश ए मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी CRPF जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराची मोठी हानी झाली आणि अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशात संताप व्यक्त होत आहे. तशातच भारताने ICC World Cup २०१९ मध्येही पाकिस्तानशी नियोजित असलेला सामना खेळू नये, असे मत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCI) सचिव सुरेश बाफना यांनी व्यक्त केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी या हल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचे स्पष्ट विधान केलेले नाही. याचाच अर्थ या हल्ल्यात पाकिस्तानचा दोष आहे. त्यामुळे पाकिस्तानबरोबर विश्वचषक स्पर्धेदरम्यान सामना खेळू नये, असे बाफना यांनी सुचवले आहे. तसेच या हल्ल्यानंतर CCI ने ब्रेबॉर्न स्टेडिअमच्या मुख्यालयात असलेला इम्रान खान यांचा फोटो झाकून टाकला होता. यावरही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

CCI ही खेळाशी संबंधित संघटना आहे. खिलाडूवृत्ती आम्हीही जाणतो. पण आमच्यासाठी खेळापेक्षाही आमचा देश अधिक महत्वाचा आहे. आम्ही आमच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. इम्रान खान यांनी या प्रकरणावर बोलायलाच हवे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. जर पाकिस्तानचा या हल्ल्यात हात नाही असे त्यांना म्हणायचे असेल, तर ते अजूनही गप्प का आहेत? असेही त्यांनी म्हटले आहे.