भारतातील पुलवामा सेक्टरमध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. क्रीडा क्षेत्रातील जाणकार, क्रिकेट संघटना व चाहतेदेखील आपला रोष व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील CCI क्लबने पाकिस्तानी खेळाडूचा फोटो हटवल्यानंतर आता मोहाली आणि राजस्थान क्रिकेट संघटनांनीदेखील आपल्या स्टेडियम्समधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो काढले होते. आता भारताची राजधानी दिल्ली येथूनही पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढले जात आहेत.

नवी दिल्ली येथील फिरोझशाह कोटला या स्टेडियममध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम, आसिफ इकबाल, इंजमाम उल हक, शोएब अख्तर, जावेद मियांदाद, वकार युनिस यांच्या सह एकूण १२ पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो होते. हे सर्व फोटो काढण्याचा निर्णय दिल्ली क्रिकेट संघटनेने घेतला आहे. या आधी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे असलेला पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी कर्णधार इम्रान खान यांचा फोटो झाकण्यात आला होता. तसेच तो फोटो भिंतीत फिक्स असून तो हटवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

त्या पाठोपाठ राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये असलेल्या खेळाडूंच्या फोटो गॅलरीमधून (प्रदर्शन) पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढण्यात आले आहेत. तसेच, पंजाब येथील मोहालीच्या PCA स्टेडियममधूनही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटोंना हटवण्यात आले आहेत.

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तनाशी कोणत्याही प्रकारचे सामने खेळले जाणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.