काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४०हून जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीदांच्या जवानांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला. असे भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला मोदी सरकारने धडा शिकवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यात क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघटनादेखील मागे नाहीत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने देशाच्या रक्षणासाठी चेंडू सोडून ग्रेनेडही हाती घेईन, असे विधान शमीने केले होते. त्यानंतर आता फिरकीपटू युझवेन्द्र चहल यानेदेखील पाकिस्तानवर आपला संताप व्यक्त केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना चहल म्हणाला की हे सगळं आता एकदाचं संपायला हवं. कारण आता आपण (भारत) अजून सहन करू शकत नाही. प्रत्येक ३ महिन्यांनी दहशतवादी कारवायांमुळे आपले जवान शहीद झाल्याच्या बातम्या येतात. मात्र आपले आणखी जवान अशा पद्धतीने शहीद होण्याची वाट आपण पाहू शकणार नाही. त्यामुळे याचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकायला हवा.

सीमेपलीकडून सतत दहशतवादी कारवाया केल्या जातात. यात कायम आपले जवान मारले जातात. त्यामुळे या गोष्टी आणखी सहन करत बसून गोष्टी आपोआप सुधारतील याची वाट बघणे बरोबर नाही. आता जे काही करायचे आहे, ते करून हा विषय कायमचा मिटवायला हवा, असेही चहल म्हणाला.

या आधी शमीनेदेखील आपला संताप व्यक्त केला होता. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात CRPF चे जवान मारले गेले. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत वेळप्रसंगी देशाच्या आणि माझ्या जवानांच्या रक्षणासाठी मी चेंडू सोडून हातात ग्रेनेडदेखील घ्यायला तयार आहे, असे त्याने म्हटले होते.