जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४०हून जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीदांच्या जवानांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सेलिब्रिटी ते अगदी सामान्य माणूस सर्वच जण या संदर्भात आपल्या परीने आर्थिक मदत करत आहेत. यात क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघटनादेखील मागे नाहीत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. याबरोबरच ”शहीद जवानांसाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धची क्रिकेट मालिका जिंकायची आहे”, असे विधान शमीने केले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात CRPF चे जवान मारले गेले. या भ्याड हल्ल्याचा त्याने तीव्र शब्दात निषेध केला. मी क्रिकेट खेळतो. पण माझा देश सीमेवरील जवानांमुळे सुरक्षित आहे. त्यामुळे गरज पडल्यास मी क्रिकेट सोडून देशेसेवेसाठी लष्करात भरती होण्यास तयार आहे. भारत देशाच्या आणि माझ्या जवानांच्या रक्षणासाठी मी चेंडू सोडून हातात ग्रेनेडदेखील घ्यायला तयार आहे. मला शहीद जवानांसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकण्याची आहे आणि तो विजय त्यांना समर्पित करायचा आहे, असे तो म्हणाला. याशिवाय त्याने CRPF ने ट्विटर हँडलवरून केलेली पोस्टदेखील रिट्विट केली आहे.

दरम्यान, CRPF जवानांच्या पत्नींना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहकार्यामध्ये शमीने त्याने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. ‘जेव्हा आम्ही आमच्या देशासाठी खेळत असतो, तेव्हा ते सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत असतात. आम्ही आमच्या जवानांच्या कुटुंबीयांची सदैव मदतीसाठी तयार आहोत आणि यापुढेही कायम सहकार्य करू’, असे यावेळी मोहम्मद शमी म्हणाला.