News Flash

Pulwama Terror Attack : आम्ही शहीदांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी – मोहम्मद शमी

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांच्यानंतर मोहम्मद शमीने केली आर्थिक मदत

जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीदांच्या जवानांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सेलिब्रिटी ते अगदी सामान्य माणूस सर्वच जण या संदर्भात आपल्या परीने आर्थिक मदत करत आहेत. यात क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघटनादेखील मागे नाहीत. यातच आता मोहम्मद शमी यानेही आपले आर्थिक योगदान दिले आहे.

CRPF जवानांच्या पत्नींना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहकार्यामध्ये शमीने मोठी मदत केली आहे. त्याने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करत आपला खारीचा वाटा उचलला आहे. ‘जेव्हा आम्ही आमच्या देशासाठी खेळत असतो, तेव्हा ते सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत असतात. आम्ही आमच्या जवानांच्या कुटुंबीयांची सदैव मदतीसाठी तयार आहोत आणि यापुढेही कायम सहकार्य करू’, असे यावेळी मोहम्मद शमी म्हणाला.

दरम्यान, BCCI चे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनीही हल्ल्यातील शहीद जवानांच्या परिवाराला बीसीसीआयने किमान ५ कोटींची मदत करायला हवी, अशी मागणी नुकतीच केली होती. या संदर्भात खन्ना यांनी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांच्याकडे पत्र लिहून मागणी केल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय, BCCI शी संलग्न असलेल्या राज्य क्रिकेट संघटना व आयपीएलमधील संघ मालकांनीही यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन खन्ना यांनी केले आहे. तसेच इराणी चषकात विजय मिळवलेला विदर्भाचा संघ, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आदी खेळाडूंनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 5:49 pm

Web Title: pulwama terror attack we will always stand with the families of our jawans says mohd shami
Next Stories
1 अनिल बिलावा झाला ‘मुंबई श्री’, डॉ. मंजिरी भावसार ठरली ‘मिस मुंबई’
2 IPL 2019 : दिल्लीच्या संघातून पुन्हा खेळण्याबाबत ‘गब्बर’ म्हणतो…
3 Pulwama Terror Attack : पाकिस्तानचा उल्लेख का नाही? सानिया मिर्झा झाली ट्रोल
Just Now!
X