नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे हक्क मिळवण्याच्या शर्यतीत क्रीडा साहित्य आणि पादत्राणे क्षेत्रातील अग्रगण्य जर्मनीची कंपनी ‘प्युमा’ अग्रेसर आहे, तर ‘आदिदास’ कंपनीचे त्यांच्यापुढे कडवे आव्हान असेल. परंतु गेल्या चार वर्षांचे पुरस्कर्ते ‘नायके’ कंपनी पुन्हा दावेदारी करणार का, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) २०१६ ते २०२० या कालावधीसाठी ‘नायके’शी ३७० कोटी रुपयांचा करार होता. याशिवाय ३० कोटी रुपये स्वामित्व हक्काचाही समावेश होता.

‘‘निविदेचा अर्ज ‘प्युमा’ने एक लाख रुपयांना खरेदी केला आहे. कोणत्याही कंपनीने निविदा अर्ज खरेदी केला, म्हणजे ते दावेदारी करणार असा अर्थ होत नाही. परंतु ‘प्युमा’ हे हक्क मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे जाणवते आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. ‘आदिदास’सुद्धा हे हक्क मिळवण्यासाठी दावा करणार असल्याचे समजते. ‘प्युमा’ची ३५० विशेष विक्री केंद्रे आहेत, त्या तुलनेत ‘आदिदास’ची ४५० विक्री केंद्रे आहेत.

‘‘पाच वर्षांसाठीचा नवा करार २०० कोटी रुपये रकमेला म्हणजेच ‘नायके’च्या करारापेक्षा अतिशय कमी रकमेला निश्चित झाल्यास आश्चर्य वाटू नये. ‘बीसीसीआय’ने ‘नायके’समोर आधीच्या करारापेक्षा कमी रकमेचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु तो त्यांनी फेटाळला. याचे दोन अर्थ निघू शकतात. एक म्हणजे ‘नायके’ला यंदा क्रिकेट साहित्य करारात रस नाही आणि दुसरा म्हणजे ‘बीसीसीआय’च्या प्रस्तावापेक्षा कमी रकमेत त्यांना करार मिळवायचा आहे,’’ असे मत एका नामांकित व्यावसायिकाने व्यक्त केले आहे.

‘प्युमा’ कंपनी गेली काही वर्षे विशेषत: इंडियन प्रीमियर लीगद्वारे भारतात गुंतवणूक करीत आहे. सध्या भारतीय कर्णधार विराट कोहली या कंपनीचा सदिच्छादूत आहे, तर के. एल. राहुलसुद्धा करारबद्ध आहे.