भारतीय महिला संघाची मराठमोळी क्रिकेटपटू पुनम राऊतने आयसीसीच्या फलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत टॉप 20मध्ये स्थान मिळवले आहे. पुनमने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केली. तिने मालिकेच्या शेवटच्या तीन सामन्यात 62, 77 आणि नाबाद 104 धावा फटकावल्या.

या दमदार कामगिरीचा फायदा पुनमला झाला असून तिने आठ स्थानांची झेप घेत 18वे स्थान गाठले आहे. तर, स्मृती मंधाना या क्रमवारीत 7व्या तर, कर्णधार मिताली राज 9व्या स्थानी आहे.

हरमनप्रीत कौरची क्रमवारी

उपकर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांची सुधारणा केली असून ती आता 15व्या स्थानावर आहे. तर, गोलंदाजांच्या यादीत तीन स्थानांचा फायदा झाला असून तिला या क्रमवारीत 49वे स्थान मिळाले आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजांच्या यादीत 18वे स्था मिळवले आहे. तर, वेगवान गोलंदाज मानसी जोशीने 69 स्थानावरून उडी घेत 64वे स्थान मिळवले आहे.

आफ्रिकेची ली प्रथम स्थानावर विराजमान

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिजेली लीने सात स्थानांची झेप घेत अव्वल स्थान मिळवले आहे. लीने इंग्लंडची सलामीवीर टेमी ब्यूमॉन्टला मागे टाकले. यापूर्वी जून 2018मध्ये ली प्रथम क्रमांकावर होती. महिला एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारी ती दक्षिण आफ्रिकेची पहिली खेळाडू आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत तिने दमदार प्रदर्शन केले आहे. गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेची अयाबोंगा खाका नवव्या स्थानावर आहे.