अनुकूल मैदान व घरच्या वातावरणात खेळण्याचा लाभ उठवीत इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये विजय मिळविण्यासाठी पुणे सिटी क्लब उत्सुक झाला आहे. त्यांना येथे नॉर्थ ईस्ट क्लबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सायंकाळी सात वाजता हा सामना होणार आहे.  पुणे संघाने गोव्यात नुकत्याच झालेल्या गोवा संघाविरुद्ध २-१ असा विजय मिळविला होता. अखेरच्या क्षणी मिळविलेल्या या विजयामुळे पुण्याच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे.

पुणे संघाचे सहायक प्रशिक्षक मिग्युएल यांनी सांगितले, ‘लागोपाठ तीन सामने येथे होणार असल्यामुळे त्यामध्ये विजय मिळविण्यावरच आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. हे सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळविणे आम्हाला सोपे जाणार आहे. गोव्याविरुद्धचा सामना जिंकल्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले राहणार आहे, मात्र प्रतिस्पर्धी संघाबाबत कोणताही फाजील आत्मविश्वास आम्ही ठेवणार नाही. आमचा महत्त्वाचा खेळाडू महंमद सिस्सोको तसेच जोनाथन लुक्का यांनी गोव्याविरुद्ध सफाईदार खेळ केला होता. त्यांच्यावर येथेही आमची मदार आहे.’

नॉर्थ ईस्ट संघाने घरच्या मैदानावर लागोपाठ दोन सामने जिंकले होते, मात्र नंतर त्यांना मुंबईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पुन्हा विजयपथावर येण्यासाठी ते येथील सामन्यात प्रयत्न करतील असा अंदाज आहे. या संघाचे प्रशिक्षक नेलो विंगाडा यांनी सांगितले, मुंबईविरुद्ध आमच्या खेळाडूंकडून नकळत काही चुका घडल्या होत्या. त्याचा फटका आम्हाला बसला होता. त्या चुका येथे घडणार नाहीत अशी मला खात्री आहे. पुण्याच्या संघास घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार आहे हे लक्षात घेऊनच आम्ही शेवटच्या मिनिटापर्यंत पूर्ण ताकदीनिशी खेळण्यावर भर देणार आहोत.

नॉर्थ ईस्ट संघाने तीन सामन्यांपैकी दोन सामनेजिंकून सहा गुणांची कमाई केली आहे. पुण्याने आतापर्यंत दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकून तीन गुणांची कमाई केली आहे.