स्टीपलचेसमध्ये यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारी ललिता बाबर, गतवेळी आशियाई सुवर्णपदक मिळविणारी सुधासिंग यांच्यासह अनेक नामवंत धावपटूंनी आगामी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीमधील आपला सहभाग निश्चित केला आहे. ही शर्यत सात डिसेंबर रोजी येथे होणार आहे.
शर्यतीचे संयोजन सचिव प्रल्हाद सावंत यांनी याबाबत सांगितले, यंदा ही शर्यत सकाळी पावणेसहा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. शहरातील वाहतुकीस शर्यतीमुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला जाणार आहे. मुख्य मॅरेथॉन शर्यत फक्त पुरुष गटासाठी होणार आहे. अर्ध मॅरेथॉन शर्यतीकरिता पुरुष व महिला हे दोन्ही गट राहणार आहेत. या तीनही शर्यतींमध्ये परदेशी धावपटूंबरोबर भारतीय स्पर्धकांची कसोटीच ठरणार आहे. दक्षिण कोरियातील आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या ललिता बाबर व सुधासिंग यांनी इंटरनेटद्वारे पुणे मॅरेथॉन शर्यतीसाठी प्रवेशिका पाठविली आहे. भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने सावरपाडा येथे आदिवासी खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून या केंद्रातील २५ खेळाडू मॅरेथॉन शर्यतीत सहभागी होणार आहेत.
शर्यतीबरोबर चॅरिटी दौड आयोजित केली जाणार असून त्याद्वारे जमा झालेल्या निधीचा उपयोग वयोवृद्ध खेळाडूंसाठी बांधण्यात येत असलेल्या निवासी संकुलाकरिता व शालेय खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी केला जाणार आहे.  
शर्यतीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट, मित्रमंडळ चौक, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२४४२८३९०) येथे संपर्क साधावा असे संयोजकांनी आवाहन केले आहे.