चेतक स्पोर्ट्स व सुवर्णयुग या दोन्ही पुण्याच्या संघांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद मिळवित पुण्याचे वर्चस्व राखले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम लढतीत चेतक संघाने चिपळूणच्या गुरुकुल संघावर ४०-१६ असा सफाईदार विजय मिळविला. पूर्वार्धात त्यांच्याकडे २६-३ अशी भक्कम आघाडी होती. तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. चेतक संघाकडून बलविंदर सिंग व दीपक कुमार यांनी चौफेर चढाया करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. गुरुकुल संघाच्या सतीश खांबे व प्रदीप शिंदे यांची लढत अपुरी ठरली.
उपांत्य फेरीत चेतक संघाने सतेज संघावर १९-१८ असा निसटता विजय मिळविला होता, तर गुरुकुल संघाने कोल्हापूरच्या शाहू सडोली संघास १५-८ असे हरविले होते.
महिलांच्या अंतिम सामन्यात बलाढय़ सुवर्णयुग संघाने आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करीत राजमाता जिजाऊ संघावर २४-८ असा सहज विजय मिळविला. पूर्वार्धात त्यांच्याकडे १२-३ अशी आघाडी होती. सामन्यातील पहिल्या पाच मिनिटांत सुवर्णयुग संघाच्या खेळाडूंनी जिजाऊ संघाच्या सायली किरीपाळे, पायल घेवारी व स्नेहल शिंदे यांच्या पकडी करीत खेळावर नियंत्रण मिळविले. या धक्क्यातून जिजाऊ संघ सावरू शकला नाही. तेथून सामन्यावरील पकड मजबूत करीत सुवर्णयुगने एकतर्फी विजय मिळविला. रेणुका तापकीर, ईश्वरी कोंढाळकर व सोनाली इंगळे यांनी सुवर्णयुग संघाच्या विजयात कौतुकास्पद कामगिरी केली.